Advertisement Advertisement

घरधनी बाहेर गेले अन् चोरट्यांनी घर फोडलं! कपाट-पेटी फोडून ४६ हजारांची रोकड अन् सोन्या-चांदीवर डल्ला; पिंपळगाव चिलमखाँमध्ये भरदिवसा ५८ हजारांची चोरी….

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): घरातील सदस्य बाहेर गेल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने घराचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला. त्यानंतर कपाट आणि लोखंडी पेटी फोडून तब्बल ४६ हजार रुपयांची रोकड, सोन्याची नथ आणि चांदीचे दागिने असा सुमारे ५८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. पिंपळगाव चिलमखाँ येथे ३१ ऑगस्ट रोजी भरदिवसा ही चोरीची घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पिंपळगाव चिलमखाँ येथील शेतकरी भानुदास शामराव खांडेभराड यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीनुसार, घरातील सदस्य बाहेर असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. घरातील कपाट तसेच लोखंडी पेटी फोडून त्यामधील रोकड आणि दागिने चोरून नेले.

चोरीस गेलेल्या ऐवजात ४६ हजार रुपयांची रोकड, अंदाजे दोन ग्रॅम वजनाची व सुमारे १० हजार रुपये किमतीची सोन्याची नथ, तसेच लहान मुलाचे चांदीचे वाळे व इतर साहित्य असा एकूण सुमारे ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे ही चोरी दुपारच्या सुमारास भरदिवसा झाल्याने गावातील नागरिकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, चोरट्याचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!