Advertisement Advertisement

वल्ली चौकात जेवायला गेले अन् जीवावर बेतलं! ५८ वर्षीय वृद्धाचा हॉटेलमध्येच मृत्यू; मदीना दरबार हॉटेलचा परवाना निलंबित, खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीला…

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): येथील वल्ली चौकातील मदीना दरबार हॉटेलमध्ये जेवण करत असताना एका ५८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना ३० ऑगस्ट रोजी घडली. या घटनेनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाने हॉटेलची पाहणी करून खाद्यपदार्थांचे नमुने घेतले. पाहणीदरम्यान स्वच्छतेसंदर्भातील नियमांचे उल्लंघन आढळून आल्याने हॉटेलचा व्यावसायिक परवाना ३१ ऑगस्ट रोजी निलंबित करण्यात आला आहे.

नारायणराव जाधव (वय ५८) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. हॉटेलमध्ये जेवताना त्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस निरीक्षक गणेश गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या घटनेची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिली.

माहिती मिळताच अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी हॉटेलमध्ये दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी व पंचनामा करून हॉटेलमधील तेल, आटा आणि रुमाली रोटीचे नमुने तपासणीसाठी घेतले. तसेच हॉटेलमधील स्वच्छतेबाबतच्या नियमांची पाहणी केली असता काही नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले.

दरम्यान, या प्रकरणी ३१ ऑगस्ट रोजी हॉटेल मालकाची अन्न व औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्तांसमोर सुनावणी घेण्यात आली. त्यानंतर तूर्तास हॉटेलचा व्यावसायिक परवाना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

खाद्यपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, वैद्यकीय अहवालाचीही प्रतीक्षा आहे. अन्नपदार्थांच्या तपासणीचा अहवाल आणि वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यास मदत होणार असून, त्यानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे.

याबाबत अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त प्रवीण पाटील यांनी सांगितले की, पोलिस व वैद्यकीय अधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले आहे. घटनेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. सध्या खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित हॉटेलचा व्यावसायिक परवाना निलंबित करण्यात आला आहे.

मृत्यू नेमका खाद्यपदार्थामुळे झाला का, याबाबत अद्याप अधिकृत निष्कर्ष समोर आलेला नसून नमुना तपासणी व वैद्यकीय अहवालानंतरच याबाबत स्पष्टता येणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!