बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देतानाच त्यांच्या शिक्षणाला आर्थिक आधार मिळावा आणि मुलींचे आर्थिक सक्षमीकरण व्हावे, या उद्देशाने राज्य शासनाने सुरू केलेल्या ‘लेक लाडकी’ योजनेचा लाभ अधिकाधिक पात्र मुलींना मिळावा, यासाठी अर्ज प्रक्रिया सुलभ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता पात्र मुलींच्या पालकांना ‘आपले सरकार’ पोर्टलच्या माध्यमातून थेट ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. त्यामुळे अंगणवाडी किंवा शासकीय कार्यालयात वारंवार जाण्याची गरज कमी होणार आहे.
या योजनेअंतर्गत पात्र मुलीला जन्मापासून वयाच्या १८ वर्षांपर्यंत विविध टप्प्यांमध्ये एकूण १ लाख १ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. शासनाच्या या निर्णयामुळे पात्र कुटुंबांना योजनेचा लाभ घेणे अधिक सोपे होणार आहे.
१५ ऑगस्ट २०२७ पर्यंत अर्जाची संधी….
१ एप्रिल २०२३ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या पात्र मुलींना ‘लेक लाडकी’ योजनेचा लाभ घेता येणार आहे. पात्र लाभार्थ्यांच्या पालकांना १५ ऑगस्ट २०२७ पर्यंत अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे अद्याप अर्ज न केलेल्या पात्र कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे.
‘आपले सरकार’वरून थेट अर्ज…..
यापुढे ‘लेक लाडकी’ योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र पालकांना ‘आपले सरकार’ पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. ऑनलाइन प्रक्रियेमुळे अर्ज करण्यासाठी शासकीय कार्यालये किंवा अंगणवाडी केंद्रांमध्ये वारंवार चकरा मारण्याची गरज कमी होईल. तसेच अर्ज प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ होण्याची अपेक्षा आहे.
कागदपत्रांचा भार कमी होणार….
योजनेसाठी अर्ज करताना आवश्यक असलेल्या कागदपत्रांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. आधार क्रमांकाच्या आधारे लाभार्थ्यांची माहिती पडताळणी केली जाणार असल्याने पालकांना कमी कागदपत्रांसह अर्ज करता येणार आहे. त्यामुळे अर्ज प्रक्रिया अधिक जलद होण्यास मदत होणार आहे.
थेट बँक खात्यात जमा होणार रक्कम….
‘लेक लाडकी’ योजनेअंतर्गत पात्र मुलीला मिळणारी आर्थिक मदत थेट बँक खात्यात जमा केली जाणार आहे. त्यामुळे मध्यस्थांची गरज राहणार नसून, शासनाकडून मिळणारा लाभ पारदर्शक पद्धतीने लाभार्थ्यापर्यंत पोहोचणार आहे.
लाभ घेण्यासाठी काय करावे?
पात्र पालकांनी ‘आपले सरकार’ पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे सादर करून मुलगी व पालकांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. अर्जाची पडताळणी झाल्यानंतर पात्रतेनुसार योजनेची आर्थिक मदत थेट लाभार्थी मुलीच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.
पात्र कुटुंबांनी अर्जाची मुदत लक्षात घेऊन वेळेत ऑनलाइन अर्ज करून ‘लेक लाडकी’ योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
















