Advertisement Advertisement

बुलढाणा जिल्हा बँकेत ‘छत्री’चं वादळ! २१ पैकी १९ जागा खिशात; ‘ट्रॅक्टर’ला फक्त २ जागा!‘जिल्हा बँकेच्या गादीवर पुन्हा सहकारच! १९ जागा जिंकून ‘छत्री’नं दाखवली आपली ताकद!

बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्युज) : बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा निकाल अखेर स्पष्ट झाला असून, सहकार पॅनलने दणदणीत विजय मिळवत जिल्हा बँकेवरील आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. एकूण २१ संचालकपदांपैकी तब्बल १९ जागा सहकार पॅनलच्या ताब्यात गेल्या असून, स्व. अजित पवार शेतकरी परिवर्तन पॅनलला केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले आहे.

निवडणूक झालेल्या ९ जागांमध्येही सहकार पॅनलने ७ जागा जिंकत आपली ताकद दाखवून दिली. त्यामुळे मतमोजणीच्या सुरुवातीला निर्माण झालेले ‘एक त्यांचा… एक यांचा!’ असे चित्र अखेर ‘सहकारचीच बाजी!’ या निकालात बदलले.

‘छत्री’ची जोरदार सरशी; ८ पैकी ७ उमेदवार विजयी….

सहकार पॅनलची निवडणूक निशाणी ‘छत्री’, तर स्व. अजित पवार शेतकरी परिवर्तन पॅनलची निशाणी ‘ट्रॅक्टर’ होती. प्रत्यक्ष निवडणूक झालेल्या ९ जागांपैकी सहकार पॅनलने ८ जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यापैकी तब्बल ७ उमेदवार विजयी झाले. दुसरीकडे परिवर्तन पॅनलने ७ जागांवर उमेदवार दिले; मात्र त्यातील केवळ २ उमेदवारांना विजय मिळवता आला.

सहकार पॅनलचे विजयी उमेदवार :

– इतर सहकारी संस्था प्रतिनिधी मतदारसंघ – सुनील राजाराम उदयकर

– इतर मागास वर्ग राखीव मतदारसंघ – गोविंदराव गणपत मिरगे

– प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था, संग्रामपूर – श्रीकांत दादाराव मारोडे

– महिला राखीव मतदारसंघ – पुष्पाबाई रामदास बारवकर

– महिला राखीव मतदारसंघ – अस्मिता प्रदीप हेलगे

– अनुसूचित जाती/जमाती मतदारसंघ – संजय भास्करराव रायमुलकर

– प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था, लोणार – गोविंद शेषराव मापारी

तर शेतकरी परिवर्तन पॅनलचे विजयी उमेदवार :

– नागरी सहकारी बँका/वैयक्तिक सभासद प्रतिनिधी मतदारसंघ – ज्ञानेश्वर पाटील

– सोसायटी मतदारसंघ, मलकापूर – शिवचंद्र तायडे

१२ जागा बिनविरोध; त्याही सहकारच्या खात्यात….

जिल्हा बँकेच्या २१ संचालकपदांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. त्यापैकी १२ जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या. या सर्व १२ जागांवर सहकार पॅनलचे उमेदवार विजयी झाले होते. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणूक झालेल्या उर्वरित ९ जागांकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते.

या ९ जागांमध्येही सहकार पॅनलने ७ जागांवर विजय मिळवल्याने अंतिम चित्र सहकार पॅनल १९ विरुद्ध शेतकरी परिवर्तन पॅनल २ असे झाले. त्यामुळे जिल्हा बँकेच्या सत्तेवर सहकार पॅनलची पकड आणखी मजबूत झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

शिंगणे-जाधवांच्या नेतृत्वावर मतदारांची मोहर?

सहकार पॅनलच्या या विजयामागे माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे नेतृत्व महत्त्वाचे ठरल्याची चर्चा आहे. दोन्ही नेते यापूर्वीच बिनविरोध निवडून आले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनलने प्रत्यक्ष निवडणूक झालेल्या ९ पैकी ७ जागा जिंकत आपली संघटनात्मक ताकद दाखवून दिली.

त्यामुळे जिल्हा बँकेच्या सत्तेची सूत्रे पुन्हा एकदा सहकार पॅनलच्या हातात राहणार असल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे.

‘अजितदादांनी जिल्हा बँकेला पुनर्जीवन दिले’ हा मुद्दा मतदारांनी स्वीकारला नाही?

प्रस्थापित सहकार पॅनलला आव्हान देण्यासाठी स्व. अजित पवार शेतकरी परिवर्तन पॅनल मैदानात उतरले होते. जिल्हा बँकेला स्व. अजित पवार यांनी पुनर्जीवन दिल्याचा मुद्दा पुढे करत आमदार मनोज कायंदे यांनी या निवडणुकीत वेगळे राजकीय समीकरण उभे करण्याचा प्रयत्न केला.

मात्र निकालात परिवर्तन पॅनलला अपेक्षित यश मिळाले नाही. ७ जागांवर उमेदवार उभे करूनही या पॅनलला केवळ २ जागा जिंकता आल्या. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख उमेदवार मनोज दांडगे यांचा पराभव झाल्याने या निकालाकडे राजकीयदृष्ट्याही वेगळ्या नजरेने पाहिले जात आहे.

ट्रॅक्टरच्या दोन जागा; पण राजकीय वाटा वेगवेगळा….

परिवर्तन पॅनलच्या दोन विजयी उमेदवारांकडे पाहिल्यासही वेगळे राजकीय चित्र दिसून येते. शिवचंद्र तायडे हे भाजपशी संबंधित असल्याचे सांगितले जाते, तर ज्ञानेश्वर पाटील हे काँग्रेसचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे परिवर्तन पॅनलच्या दोन जागांच्या विजयाचे राजकीय श्रेय एका पक्षाला देता येणार नाही.

दुसरीकडे सहकार पॅनलने विविध मतदारसंघांमध्ये संघटनात्मक ताकद, स्थानिक पातळीवरील संपर्क आणि सहकार क्षेत्रातील पकड यांच्या जोरावर मोठा विजय मिळवला.

जिल्हा बँकेच्या सत्तेचे गणित स्पष्ट…..

निवडणुकीपूर्वी सहकार पॅनलला आव्हान देत मैदानात उतरलेल्या शेतकरी परिवर्तन पॅनलने काही मतदारसंघांत प्रभाव दाखवला असला, तरी संपूर्ण जिल्हा बँकेच्या सत्तेचे गणित बदलण्याइतपत यश मिळवता आले नाही.

२१ पैकी १९ जागा सहकार पॅनलकडे आणि केवळ २ जागा परिवर्तन पॅनलकडे गेल्याने बुलढाणा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलने निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. हा निकाल केवळ उमेदवारांच्या विजय-पराभवापुरता मर्यादित नसून, जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील सध्याच्या राजकीय समीकरणांचेही स्पष्ट प्रतिबिंब मानले जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!