सिंदखेडराजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : नागपंचमीच्या सणाचा उत्सव सुरू असतानाच हनवतखेड परिसरातील मांगीर बाबा मंदिरालगतच्या तलावाच्या काठावरील शिवारात महाकाय अजगराने एका बकरीला गिळल्याची थरारक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, बकरीला गिळल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा अजगर शिवारात मृतावस्थेत आढळून आला. या घटनेने परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याच्या बकरीवर अजगराने झडप घातली आणि तिला अख्खी गिळल्याचे सांगण्यात येत आहे. दुसऱ्या दिवशी अजगर मृतावस्थेत आढळल्यानंतर त्याचे पोट फुगलेले दिसून आले. त्यामुळे अजगराने बकरी गिळल्याचे लक्षात आले. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.
दरम्यान, वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घटनास्थळी पंचनामा करण्यात आला. वनविभागाने अजगराचे शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, अजगराच्या पोटात गिळलेली बकरी असल्याचे स्पष्ट झाले.
शिवारात आणखी एक अजगर असल्याचा दावा….
मांगीर बाबा मंदिर परिसरातील तलावाकाठच्या शिवारात आणखी एक महाकाय अजगर फिरत असल्याचा दावा स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे शेतात कामासाठी जाणाऱ्या शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वनविभागाने तातडीने परिसरात शोधमोहीम राबवून दुसऱ्या अजगराचा शोध घ्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी उमेश गायकवाड यांनी वनविभागाच्या पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. वनविभागाने घटनेचा रीतसर पंचनामा केला असून, मृत अजगराचे शवविच्छेदन करण्यात येणार असल्याची माहिती अधिकारी उमेश गायकवाड यांनी दिली.
अफवांवर विश्वास न ठेवण्याचे वनविभागाचे आवाहन….
अजगर माणसाला गिळू शकतो का, याबाबत परिसरात विविध चर्चा आणि अफवा सुरू आहेत. मात्र, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन वनविभागाने केले आहे. शेतात किंवा परिसरात अजगर अथवा अन्य वन्यजीव आढळल्यास त्याच्या जवळ जाऊ नये किंवा त्याला त्रास देऊ नये. तातडीने वनविभागाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.














