देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : अवैध वाळू वाहतुकीविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल पथकासोबत धक्कादायक प्रकार घडल्याची घटना समोर आली आहे. वाळूने भरलेला टिप्पर थांबवून तपासणी केल्यानंतर तो पोलीस ठाण्यात नेण्याच्या प्रयत्नात चालकाने टिप्पर पळवून नेल्याचा आरोप आहे. पाठलागादरम्यान टिप्परने महसूल पथकाच्या वाहनाला धडक दिल्याचे, तसेच लाल रंगाच्या ब्रेझा कारने रस्ता अडवून टिप्परला पळून जाण्यास मदत केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी देऊळगाव तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या तक्रारीवरून अंढेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, १९ ऑगस्ट रोजी पहाटे सुमारे ५ वाजता तहसीलदार वैशाली डोंगरजाळ या तलाठी आकाश राधाकिसन खरात, शिपाई पंजाबराव तेजराव ताटे आणि चालक संतोष धोंडूजी भोपळे यांच्यासोबत शासकीय वाहनाने अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईसाठी निघाल्या होत्या. सकाळी सुमारे ६.४५ वाजता अंढेरा फाट्याजवळ महसूल पथक थांबले असताना देऊळगाव महीच्या दिशेने पांढऱ्या रंगाचा वाळूने भरलेला टिप्पर क्रमांक MH 46 D 5511 येताना दिसला.
महसूल पथकाने टिप्परला थांबण्याचा इशारा केला. टिप्पर थांबवल्यानंतर तपासणी केली असता त्यामध्ये अंदाजे ८० हजार रुपये किमतीची चार ब्रास रेती असल्याचे आढळून आले. वाळू वाहतुकीची रॉयल्टी विचारली असता चालकाकडे रॉयल्टी नसल्याचे त्याने सांगितले. टिप्पर मालकाबाबत विचारणा केली असता तो हर्षल मनोहर अंभोरे, रा. एकलारा यांचा असल्याचे चालकाने सांगितले.
‘टिप्पर घेऊन जा…’ म्हणत कारवाईत अडथळा आणल्याचा आरोप…..
टिप्पर चालकाची माहिती घेत असतानाच लाल रंगाची ब्रेझा कार तेथे आली. त्यातून खाली उतरलेल्या व्यक्तीने आपले नाव हर्षल अंभोरे असल्याचे सांगत टिप्पर आपलाच असल्याचे सांगितले. त्यानंतर चालकाला टिप्पर घेऊन जाण्यास सांगण्यात आले. ‘टिप्पर पळवून घेऊन जा, कोणी मध्ये आले तर उडवून टाक; नंतर मी बघून घेतो’, अशा स्वरूपाचे वक्तव्य करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.यानंतर टिप्पर चालकाने टिप्पर चिखलीच्या दिशेने पळवून नेल्याचे तक्रारीत नमूद आहे.
५०० मीटर पाठलाग; महसूल पथकाच्या वाहनाला धडक
टिप्पर पळून गेल्यानंतर महसूल पथकाने खाजगी वाहनाने सुमारे ५०० मीटरपर्यंत त्याचा पाठलाग केला. टिप्पर चालकाला वाहन थांबविण्याचा इशारा करण्यात आला. मात्र, चालकाने महसूल पथकाच्या वाहनाच्या उजव्या बाजूला टिप्पर धडकविल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
दरम्यान, टिप्परचा पाठलाग सुरू असताना मागून पुन्हा लाल रंगाची ब्रेझा कार आली. या कारच्या चालकाने महसूल पथकाच्या वाहनासमोर कार आडवी उभी करून रस्ता अडविला आणि टिप्परला पळून जाण्यास मदत केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या संपूर्ण प्रकारामुळे देऊळगाव राजा तालुक्यातील अवैध वाळू वाहतुकीमागे नेमके कोणाचे पाठबळ आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. महसूल पथकाच्या सुरक्षेचाही मुद्दा या घटनेमुळे ऐरणीवर आला आहे.
तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या तक्रारीवरून अंढेरा पोलीस ठाण्यात संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.













