Advertisement Advertisement

मध्यरात्री रेती तस्करांवर महसूलची धडक; सिनगाव जहागीर शिवारातून दोन टिप्पर जप्त….

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यात सुरू असलेल्या रेतीच्या अवैध उत्खनन व वाहतुकीविरोधात महसूल विभागाने धडक कारवाई केली. तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या नेतृत्वाखाली महसूल पथकाने १० ऑगस्ट रोजी मध्यरात्री सिनगाव जहागीर शिवारात कारवाई करत रेतीची वाहतूक करणारे दोन टिप्पर ताब्यात घेतले.

सिनगाव जहागीर शिवारातून रात्रीच्या वेळी अवैधरीत्या रेतीची वाहतूक होत असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथकाने मध्यरात्री सुमारे अडीच वाजता परिसरात धडक दिली. यावेळी रेतीची वाहतूक करणारे दोन टिप्पर आढळून आले.

महसूल पथकाने दोन्ही टिप्पर ताब्यात घेतले असून, त्यांचे क्रमांक एमएच २१ बीएच ९००१ आणि एमएच २८ एबी ७९५८ असे आहेत. जप्त करण्यात आलेली दोन्ही वाहने पुढील दंडात्मक कारवाईसाठी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात अटकावून ठेवण्यात आली आहेत.

संबंधित वाहनांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महसूल विभागाकडून देण्यात आली आहे. या कारवाईत ग्राम महसूल अधिकारी आकाश खरात, परमेश्वर बुरकुल, बबन काकड आणि विठ्ठल हरणे सहभागी झाले होते.

रात्रीच्या कारवाईने रेती वाहतूकदारांमध्ये खळबळ….

तालुक्यात रेतीचे अवैध उत्खनन आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी महसूल विभागाकडून नियमित तपासणी व कारवाई सुरू आहे. मध्यरात्री करण्यात आलेल्या या धडक कारवाईमुळे अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. महसूल विभागाच्या या कारवाईमुळे अवैध रेती वाहतुकीवर कितपत अंकुश बसतो, याकडे आता लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!