मेहकर : (बुलडाणा कव्हरेज न्युज) मेहकर शहरातील रामनगर परिसरात राहणाऱ्या ३२ वर्षीय युवकाचा गंभीर भाजल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला. अमोल रमेश डाखोरे असे मृत युवकाचे नाव आहे. शुक्रवारी पहाटे त्याने स्वतःला पेटवून घेतल्याची घटना घडली होती. गंभीर अवस्थेत त्याच्यावर बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, रविवारी (दि. ९) सायंकाळी उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.
अमोल डाखोरे हा मूळचा मेहकर तालुक्यातील मांडवा फॉरेस्ट येथील रहिवासी होता. रोजगारासाठी तो मेहकर शहरात राहत होता. शहरातील एका भोजनालयात काम करून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. पत्नी आणि लहान मुलासह रामनगर परिसरात भाड्याच्या खोलीत त्याचा संसार सुरू होता.
शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास अमोलने ज्वलनशील पदार्थ अंगावर घेऊन स्वतःला पेटवून घेतले. या घटनेत तो गंभीररीत्या भाजला. घटनेची माहिती मिळताच त्याला तातडीने मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू होते. अखेर रविवारी सायंकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे अमोलच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, पत्नी आणि लहान मुलासह कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. घटनेबाबत संबंधित यंत्रणेकडून पुढील कार्यवाही














