चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : मिरची विकून रात्री गावाकडे परतणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालवाहू वाहनाला अडवून केवळ हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून सहा जणांनी शेतकरी व चालकाला काठ्या, लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना ७ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास चिखली तालुक्यातील हातणी गावाजवळ घडली. या मारहाणीत दोन्ही शेतकरी जखमी झाले असून, त्यांच्यावर बुलढाणा येथे उपचार करण्यात आले. उपचारानंतर त्यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.याप्रकरणी किन्होळा येथील राजेंद्र पाटीलबा बाहेकर यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.
जाफ्राबाद बाजारातून परतताना घडला प्रकार….
तक्रारीनुसार, राजेंद्र बाहेकर आणि गजानन लक्ष्मण बाहेकर हे आपल्या शेतातील मिरची पोत्यांमध्ये भरून टाटा सुप्रो मालवाहू वाहनातून जाफ्राबाद येथील बाजारात विक्रीसाठी गेले होते. वाहन शेख मिसार शेख मैहमुद हे चालवत होते. मिरचीचा लिलाव आटोपल्यानंतर तिघेही मालवाहू वाहनातून किन्होळ्याकडे परतत होते.
दरम्यान, हातणी गावाजवळ पुढे जाण्यासाठी चालकाने दुचाकींना हॉर्न वाजवला. याच कारणावरून दुचाकींवरील तरुण संतप्त झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
गाडी अडवून सुरू केला वाद….
हातणीसमोर दुचाकींवरील तरुणांनी हात दाखवून मालवाहू वाहन थांबवले. त्यानंतर “हॉर्न जोरात का वाजविला?” असे म्हणत त्यांनी वाद घातल्याचे तक्रारीत नमूद आहे.
राजेंद्र बाहेकर हे संबंधितांना समजावून सांगत असताना त्यांच्यावर काठीने हल्ला करण्यात आला. त्यांच्या उजव्या हातावर आणि डोक्यावर काठीने प्रहार करण्यात आल्याचा आरोप आहे. मारहाणीत ते खाली कोसळल्यानंतर त्यांना वाचवण्यासाठी गजानन बाहेकर पुढे आले.
यावेळी गजानन बाहेकर यांच्या डोक्यावर, चेहऱ्यावर, छातीवर तसेच दोन्ही पायांवर काठ्यांनी मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. वाहनचालक शेख मिसार यालाही शिवीगाळ करून पाठ व कमरेवर लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मदतीसाठी व्यक्ती येताच हल्लेखोर पसार….
दरम्यान, भगवान बाहेकर घटनास्थळी पोहोचताच मारहाण करणारे संशयित हातणीच्या दिशेने पसार झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणात तक्रारीमध्ये सहा संशयितांची नावे देण्यात आली आहेत.
मारहाणीत जखमी झालेल्या शेतकरी व चालकाने प्रथम बुलढाणा येथे उपचार घेतले. त्यानंतर राजेंद्र बाहेकर यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत.













