नांदुरा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : पिंपळखुटा धांडे येथील माहेरी गेलेली विवाहिता घरी परतली नसल्याने नांदुरा पोलिसांत हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. मिरा गणेश धांडे असे बेपत्ता विवाहितेचे नाव असून, ४ ऑगस्ट रोजी तिचे पती गणेश धांडे यांनी नांदुरा पोलिसांत तक्रार दाखल केली.
मिळालेल्या माहितीनुसार, मिरा धांडे या ११ जुलै रोजी माहेर चिंचखेड येथे जाते, असे सांगून घरातून बाहेर पडल्या होत्या. मात्र, बराच कालावधी उलटूनही त्या घरी परतल्या नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला.
सासऱ्यांनी चिंचखेड येथे जाऊन तिच्या माहेरीही चौकशी केली. मात्र, मिरा धांडे यांचा कुठेही शोध लागला नाही. अखेर पती गणेश धांडे यांनी नांदुरा पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी मिसिंगची नोंद केली आहे.
बेपत्ता मिरा धांडे यांचा रंग सावळा, बांधा सडपातळ असून उंची अंदाजे ५ फूट आहे. बेपत्ता होताना त्यांनी कथीया रंगाची साडी व जांभळ्या रंगाचा ब्लाऊज परिधान केला होता.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार दीपक सोळंके करीत आहेत. मिरा धांडे यांच्याबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास नांदुरा पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.













