मलकापूर पांग्रा(बुलडाणा कव्हरेज न्युज): गेल्या काही दिवसांपासून मलकापूर पांग्रा आणि पोफळ शिवणी परिसरात “बिबट्या आला” अशी जोरदार चर्चा सुरू होती. मोबाईलवर बिबट्याचे व्हिडिओ तसेच शेळीच्या शिकारीचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने शेतकरी, महिला आणि पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, वन विभागाच्या तपासणीत या चर्चेला कोणताही आधार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. परिसरात बिबट्याचा वावर आढळून आलेला नाही.
व्हायरल व्हिडिओची वन विभागाकडून चौकशी….
गोकुळ आई मंदिर परिसरातील शेतांमध्ये बिबट्या फिरत असल्याचा दावा करत काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. एका मेंढपाळाने बिबट्याचा व्हिडिओ काढल्याची चर्चा होती. मात्र, वन विभागाने संबंधित मेंढपाळाची चौकशी केली असता त्याने असा कोणताही व्हिडिओ काढला नसल्याचे तसेच त्याला बिबट्या दिसला नसल्याचे सांगितले.
त्यामुळे सोशल मीडियावर फिरणारा हा व्हिडिओ परिसरातील बिबट्याचा असल्याचा दावा चुकीचा असल्याचे समोर आले.
शेळीच्या शिकारीचे फोटोही बनावट दाव्याने व्हायरल…
वडगाव माळी परिसरातील एका शेतकऱ्याच्या शेळीचे लचके तोडल्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हे कृत्य बिबट्याने केल्याची चर्चा रंगली होती. मात्र वन विभागाच्या चौकशीत सदर शेळी आजारी होती आणि कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला केल्याचे समोर आले. त्यामुळे या घटनेचा बिबट्याशी कोणताही संबंध नसल्याचे वन विभागाने स्पष्ट केले.
वनरक्षक ज्ञानेश्वर आरू यांचे स्पष्टीकरण…
या प्रकरणी वनरक्षक अधिकारी ज्ञानेश्वर आरू यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले व्हिडिओ आणि फोटो तपासण्यात आल्याचे सांगितले. त्यांच्या माहितीनुसार, परिसरात बिबट्याच्या वावराची कोणतीही अधिकृत नोंद किंवा ठोस पुरावा आढळलेला नाही.
त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडियावरील कोणत्याही पोस्ट किंवा व्हिडिओची खात्री न करता त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.
शेतकरी, पशुपालकांनी घाबरू नये….
खरीप हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांचे शेतातील काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे अफवांमुळे शेतकऱ्यांनी अनावश्यक भीती बाळगू नये. मात्र, वन विभागाने सतर्कता बाळगण्याचे आणि पशुधन सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे आवाहन केले आहे.
परिसरात भविष्यात एखादा संशयास्पद प्राणी दिसल्यास त्याचा व्हिडिओ अथवा फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याऐवजी थेट वन विभागाला माहिती द्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
















