Advertisement Advertisement

साखरखेर्ड्यात ई-क्लास जमिनीवरून वाद; क्रीडांगणावर नांगरणीचा आरोप, चौकशीची ग्रामस्थांची मागणी!सरकारी जमिनीचे संरक्षण करून क्रीडांगण कायम राखावे; युवकांचा आंदोलनाचा इशारा…

साखरखेर्डा (बुलडाणा कव्हरेज न्यूज) :साखरखेर्डा येथील सरकारी ई-क्लास जमिनीवरील क्रीडांगणाच्या जागेवर नांगरणी करून ताबा घेण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी तहसीलदार अजित दिवटे तसेच साखरखेर्डा पोलिस ठाण्याचे ठाणेदार युवराज रबडे यांच्याकडे करण्यात आली आहे. दरम्यान, क्रीडांगणाची जागा कायम राखण्याच्या मागणीसाठी गावातील युवकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, साखरखेर्डा भाग-२ मधील गट क्रमांक ८७० मधील एकूण ९.६२ हेक्टर क्षेत्रापैकी सुमारे १.६२ हेक्टर जमीन पूर्वी साखरखेर्डा एज्युकेशन सोसायटीला भाडेतत्त्वावर देण्यात आली होती. या जागेवर अनेक वर्षांपासून क्रीडांगण विकसित करण्यात आले असून विद्यार्थी, युवक आणि नागरिक नियमितपणे त्याचा वापर करत आहेत. महसूल विभागाने जमीन शासन ताब्यात घेतल्यानंतरही ती क्रीडांगणासाठीच राखून ठेवावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

मात्र, अलीकडे संबंधित जागेवर नांगरणी करण्यात आल्याने सरकारी जमिनीवर अतिक्रमणाचा प्रयत्न झाल्याचा आरोप युवकांनी केला आहे. तसेच ई-क्लास जमिनींच्या व्यवहारात अनियमितता झाल्याचाही आरोप काही ग्रामस्थांनी केला आहे. मात्र, या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नसून, याबाबत संबंधित यंत्रणेकडून चौकशी होणे अपेक्षित आहे.

युवा शिंदेसेनेचे तालुका प्रमुख संदीप मगर यांनी सांगितले की, “या प्रकरणाची सखोल चौकशी करून सरकारी जमिनीचे संरक्षण करावे. आवश्यकता भासल्यास हा विषय विधिमंडळात मांडण्यासाठीही पाठपुरावा करण्यात येईल.”

दरम्यान, साखरखेर्डा ग्रामपंचायतीने सदर ई-क्लास जमीन क्रीडांगणासाठी कायम राखण्यात यावी, असा ठराव मंजूर करून तो सिंदखेडराजा तहसीलदारांकडे सादर केला आहे. या ठरावाची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी सरपंच ज्योती अमित जाधव यांनी केली आहे.

या पार्श्वभूमीवर गावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी महसूल विभागाने आवश्यक ती कार्यवाही करणे गरजेचे असल्याचे साखरखेर्डा पोलिस ठाण्याचे ठाणेदार युवराज रबडे यांनी सांगितले. तसेच पोलिस परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!