चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज)बुलढाणा जिल्ह्यातील अनेक स्वीट मार्ट्समध्ये ग्राहकांच्या आरोग्याशी आणि खिशाशी खेळ सुरू असल्याचा आरोप पुढे येत आहे. शुद्ध दुधापासून तयार केलेल्या खव्याचे पेढे, बर्फी आणि इतर मिठाई असल्याचा दावा करून प्रत्यक्षात वनस्पती तेल (पामोलिन), दूध पावडर, साखर आणि इतर घटकांपासून तयार केलेले पदार्थ विकले जात असल्याची चर्चा आहे. यामुळे ग्राहकांची दिशाभूल होत असून अन्न व औषध प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील काही नामांकित स्वीट मार्ट्समध्ये विकल्या जाणाऱ्या स्पेशल बर्फी, पेढे आणि इतर मिठाई शुद्ध दुधापासून तयार केलेली नसून त्यामध्ये दूध पावडर, रिफाइंड पामोलिन ऑईल व इतर पर्यायी घटकांचा वापर केला जातो. अशा प्रकारच्या मिठाईची विक्री नियमांनुसार करता येत असली, तरी ग्राहकांना त्या पदार्थांचे खरे स्वरूप स्पष्टपणे सांगणे बंधनकारक आहे.
अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाच्या (FSSAI) नियमांनुसार, मिठाईमध्ये पामतेल किंवा इतर पर्यायी घटकांचा वापर केला असल्यास त्याचा स्पष्ट उल्लेख असलेला माहिती फलक ग्राहकांना दिसेल अशा ठिकाणी लावणे आवश्यक आहे. मात्र अनेक ठिकाणी हा नियम पाळला जात नसल्याचे दिसून येत असून ग्राहकांना शुद्ध दुधाची मिठाई असल्याचा समज करून दिला जात असल्याची तक्रार आहे.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, प्रक्रिया केलेल्या घटकांपासून बनविलेल्या मिठाईचे सातत्याने सेवन केल्यास आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात. त्यामुळे मिठाई खरेदी करताना ती कोणत्या घटकांपासून तयार केली आहे, याची माहिती ग्राहकांनी विक्रेत्याकडून घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
परप्रांतीय व्यावसायिकांचे वाढते जाळे…
गत काही वर्षांत जिल्ह्यात शुद्ध दूध, खवा आणि पनीरपासून मिठाई तयार करणाऱ्या पारंपरिक व्यावसायिकांची संख्या कमी झाली आहे. त्यांच्या जागी विविध राज्यांतून आलेल्या काही व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणावर स्वीट मार्ट सुरू केले असून ते पर्यायी घटकांपासून तयार केलेली मिठाई तुलनेने कमी खर्चात विकत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पारंपरिक स्थानिक मिठाई व्यवसायावर परिणाम झाल्याचे व्यापारी सांगत आहेत.
दरम्यान, ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या मिठाई विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासन प्रत्यक्ष तपासणी करून कारवाई करणार का, याकडे आता जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे. तथापि, या प्रकरणातील आरोपांची अधिकृत तपासणी आणि संबंधित विक्रेत्यांची बाजू समोर येणे अद्याप बाकी आहे.












