Advertisement Advertisement

“एसपी निलेश तांबे हटवा!; कारवाईच्या मागणीसाठी पृथ्वीराज गायकवाडांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण!

वाढती गुन्हेगारी, अवैध धंदे, हप्तेवसुली, गोवंश तस्करी व कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावर धर्मवीर युथ फाऊंडेशन आक्रमक; चौकशी व निलंबनाची मागणी…

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): जिल्ह्यात वाढती गुन्हेगारी, अवैध धंदे आणि ढासळलेल्या कायदा-सुव्यवस्थेविरोधात धर्मवीर युथ फाऊंडेशन तसेच विविध सामाजिक संघटना आक्रमक झाल्या आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांना निलंबित करून त्यांच्या कार्यकाळाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी धर्मवीर युथ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदारपुत्र पृथ्वीराज संजय गायकवाड यांनी बुधवार (१ जुलै)पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

या आंदोलनात शेकडो युवक, शिवसैनिक, महिला आणि नागरिक सहभागी झाले. जोपर्यंत पोलिस अधीक्षकांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा इशारा पृथ्वीराज गायकवाड यांनी दिला.

उपोषणादरम्यान त्यांनी जिल्ह्यात अवैध दारू विक्री, जुगार, वरळी मटका, वाळू तस्करी, गोवंश तस्करी आणि अमली पदार्थांची विक्री राजरोसपणे सुरू असल्याचा आरोप केला. पोलिस प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले.

तसेच, जळगाव जामोद तालुक्यातील रसलपूर येथे आढळलेल्या अज्ञात महिलेच्या हत्येचा उलगडा अद्याप झालेला नसल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणात निष्पाप नागरिकांना मारहाण करून गुन्ह्याची कबुली देण्यास भाग पाडल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

याशिवाय, आजारी आईसाठी मेडिकलमधून औषध आणणाऱ्या एका शेतकरी पुत्राला कोणतीही शहानिशा न करता पोलिस अधीक्षकांनी मारहाण केल्याचा आरोप गायकवाड यांनी केला. जिल्ह्यात घरफोडी, दुचाकी व चारचाकी चोरी, मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून अनेक प्रकरणांमध्ये आरोपींची माहिती असूनही कारवाई होत नसल्याचे त्यांनी सांगितले.

अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या वाढत्या घटनांबाबत तसेच गोवंश तस्करीवर प्रभावी कारवाई होत नसल्याबाबतही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे गंभीर आक्षेप नोंदवले.

यावेळी नगरपालिका गटनेते मृत्युंजय गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत यांच्यासह शेकडो शिवसैनिक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

टीप : या वृत्तातील आरोप हे आंदोलनकर्त्यांनी केलेले असून त्याबाबत पोलिस प्रशासनाची अधिकृत भूमिका समोर आलेली नाही.

Join WhatsApp

Join Now

Latest Stories

Leave a Comment

WhatsApp Join Group!