जिल्ह्यात ३१७ सिकलसेल रुग्ण आढळले; प्रभावी नियंत्रण शक्यसिकलसेलमुक्तीसाठी ‘अरुणोदय’ विशेष अभियान….

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्यूज):
जिल्ह्यात सिकलसेल अ‍ॅनिमियाचे एकूण ३१७ रुग्ण आढळून आले असून, १,७३१ नागरिक सिकलसेल वाहक असल्याची नोंद आरोग्य विभागाकडे आहे. विशेषतः आदिवासी व काही विशिष्ट समाजघटकांमध्ये सिकलसेल आजाराचे प्रमाण अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र वेळेत तपासणी व योग्य उपचार केल्यास या आजारावर प्रभावी नियंत्रण मिळवता येऊ शकते, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.


राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या वतीने ‘अरुणोदय सिकलसेल अ‍ॅनिमिया विशेष अभियान’ जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. हे अभियान १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी या कालावधीत सुरू असून, यामध्ये जनजागृती, मोफत तपासणी, सिकलसेल रुग्ण व वाहकांची ओळख, समुपदेशन तसेच आवश्यक उपचार व संदर्भ सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
ग्रामीण व आदिवासी भागांमध्ये आरोग्य पथकांमार्फत गृहभेटी देऊन सिकलसेल सोल्युबिलिटी तपासणी करण्यात येत आहे.

या मोहिमेत प्रजननक्षम वयोगटातील नागरिकांवर विशेष भर देण्यात आला आहे. सिकलसेल हा संसर्गजन्य नसून आनुवंशिक आजार असल्याची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवली जात असून, विवाहपूर्व व गर्भधारणेपूर्व तपासणीचे महत्त्व पटवून दिले जात आहे.


जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक-सेविका, आशा स्वयंसेविका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.

नागरिकांनी या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते यांनी सांगितले की, ‘सिकलसेल मुक्त बुलढाणा’ हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून राबविण्यात येणारी अरुणोदय मोहीम निरोगी पिढीच्या निर्मितीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!