अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज)शेतीच्या जुन्या वादातून एका तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची गंभीर घटना समोर आली असून, या प्रकरणी तब्बल ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १९ व २१ जानेवारी रोजी घडली असून परिसरात खळबळ उडाली आहे.

जाहिरात 👆
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी व मोतीराम भाऊसिंग दधरे यांच्यात शेतीचा वाद असून तो सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. १९ जानेवारी रोजी रात्री सुमारे ९ वाजताच्या सुमारास फिर्यादीचा मुलगा अजय हा घरासमोर गल्लीत उभा असताना आरोपी सतीश पिछोरे याने कोणतेही कारण नसताना शिवीगाळ सुरू केली. याबाबत जाब विचारल्यावर आरोपीने अजयच्या उजव्या कानाजवळ चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी केले.यानंतर २१ जानेवारी रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास फिर्यादी महिला घरी असताना आरोपी सतीश पिछोरे याने पुन्हा अश्लील शिवीगाळ सुरू केली.
यावेळी फिर्यादीने परवा आपल्या मुलावर चाकूने हल्ला केल्याबाबत जाब विचारल्यावर आरोपीने तिच्याशी वाद घालत मारहाण केली तसेच तिची साडी ओढून खाली पाडल्याचा आरोप आहे. भांडण सोडविण्यासाठी अजय मध्ये पडताच आरोपीने त्याच्यावर पुन्हा चाकूने हल्ला केला.
दरम्यान, आरोपी सतीश पिछोरेच्या घरातून रतिराम दधरे, नारायण दधरे, सविता दधरे, कविता दधरे, लता सुनकरे, जानकाबाई पिछोरे व सविता पिछोरे हे बाहेर येऊन त्यांनीही फिर्यादी व तिच्या मुलास शिवीगाळ करत जीवाने मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात ९ आरोपींविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलीस करत आहेत.












