मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज):मलकापूर व नांदुरा येथील भंगार व्यावसायिकांमध्ये भंगार खरेदी-विक्रीच्या वादातून झालेल्या हाणामारीत चाकूचा वापर करण्यात आल्याची घटना आज दि. २३ जानेवारी रोजी दुपारी चारखांबा चौक परिसरात घडली. या घटनेत एक जण जखमी झाला असून, या प्रकरणी तिघांविरुद्ध मलकापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फिर्यादी मोहम्मद रियाजुल मोहम्मद इलीयास (रा. चारखांबा चौक, मलकापूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी गुलाम मोहम्मद अब्दुल रजाक उर्फ गुल्लु (वय ३०, रा. नांदुरा) हा भंगाराचा व्यापारी असून तो जळगाव येथून भंगार खरेदी करीत होता. फिर्यादी व आरोपी एकाच व्यापाऱ्याकडून भंगार खरेदी करीत असल्याने आरोपीने मनात राग धरून जिवे मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीच्या भावाच्या पोटात चाकू खुपसल्याचा आरोप आहे.
यावेळी आरोपीसोबत असलेले जुबेर खान हमीद खान (वय ३२) व आसिफ खान मलंग खान (वय २५, दोघेही रा. नांदुरा) यांनी संगनमत करून फिर्यादी व साक्षीदारांना चाकू व चापटाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात अप.क्र. ४०/२०२६ अन्वये कलम १०९(१), ३५२, ३(५) बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सतीश बेले करीत आहेत.












