बुलढाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज):नागरिकांना महसूल विभागाशी थेट, जलद व सुलभ संपर्क साधता यावा, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने ‘महसूल मित्र – सुलभ चॅटबॉट सेवा’ सुरू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही व्हॉट्सअॅप आधारित सेवा नागरिकांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
नागरिकांना आता ९४२३१८४८०४ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर संदेश पाठवून किंवा क्यूआर कोड स्कॅन करून घरबसल्या महसूल विभागाशी संपर्क साधता येणार आहे. ही सेवा मराठी व इंग्रजी भाषेत उपलब्ध असून महसूल विभागाशी संबंधित विविध सेवांची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे.
या चॅटबॉटच्या माध्यमातून सेवा हक्क कायद्यांतर्गत मिळणाऱ्या सेवा, सेतू केंद्रांसाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती, जुने महसूल अभिलेख, तसेच नागरिकांच्या महसूलविषयक तक्रारींची ऑनलाइन नोंद व त्याचा पाठपुरावा करता येणार आहे. तसेच शेतीविषयक कायदे, नियम, जमिनीचे रेकॉर्ड याबाबत एआय आधारित उत्तरे मिळणार आहेत.
याशिवाय जवळचे आधार केंद्र शोधण्याची सुविधा, बुलढाणा जिल्ह्याचा डॅशबोर्ड, महसूल विभागाचे शासन निर्णय (जीआर) शोध, संजय गांधी निराधार योजनेच्या अनुदानाची स्थिती, तसेच जिल्हाधिकारी, उपविभागीय व तहसील कार्यालयांतील विविध सेवांसाठी अर्ज प्रक्रियेचे मार्गदर्शन या सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
हा प्लॅटफॉर्म अँड्रॉइड, आयओएस आणि संगणकावर वापरण्यास सक्षम असून, त्यामुळे नागरिकांचा वेळ व खर्च वाचणार आहे. या सुलभ चॅटबॉट सेवेमुळे महसूल प्रशासनात पारदर्शकता वाढून नागरिकांना घरबसल्या सेवा मिळणार आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील नागरिक व शेतकऱ्यांनी ‘महसूल मित्र – सुलभ चॅटबॉट सेवा’चा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.















