मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज):
मेहकर शहरात चोरीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसून, चोरट्यांचे धाडस आता थेट भरदिवसा दिसून येत आहे. शहरातील शिक्षक कॉलनीत गुरुवारी (दि. ८) दुपारी सुमारे दोन वाजताच्या सुमारास दिवसाढवळ्या घरफोडीचा धक्कादायक प्रकार घडला. चोरट्यांनी अवघ्या अर्ध्या तासात सुमारे ५० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिक्षक कॉलनीतील जी. डी. राठोड यांच्या मालकीच्या घरात सिद्धू पवार हे भाडेकरू म्हणून वास्तव्यास आहेत. गुरुवारी दुपारी पवार यांच्या पत्नी काही कामानिमित्त घराबाहेर गेल्या होत्या. हीच संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाज्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरात प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी कपाटांची झडती घेत संपूर्ण घर अस्ताव्यस्त केले.
कपाटाला कुलूप नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी सुमारे तीन ग्रॅम वजनाची सोन्याची कानातील फुले तसेच रोख रक्कम चोरून नेली. चोरीस गेलेल्या एकूण ऐवजाची किंमत अंदाजे ५० हजार रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
अर्ध्या तासानंतर पवार यांच्या पत्नी घरी परतल्या असता, दरवाजा उघडा आणि घरातील सामान विस्कळीत अवस्थेत दिसल्याने घरफोडी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ शेजारील नागरिकांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली.
मेहकर शहरात गेल्या काही महिन्यांपासून शिक्षक कॉलनी, पवनसूत नगर व इतर भागांत चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. चोरट्यांना पोलिसांचा धाक उरलेला नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. काही भागांत नागरिकांनी स्वतःच रात्रीचा पहारा सुरू केला असतानाच आता दिवसाढवळ्या घरफोडी झाल्याने भीती अधिकच गडद झाली आहे.
या वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी तातडीने गस्त वाढवावी, सीसीटीव्ही तपास वाढवावा व चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.











