बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) :देवदर्शनासाठी नाशिक येथून त्र्यंबकेश्वरकडे निघालेल्या विद्यार्थ्यांच्या दुचाकीवर भरधाव हायवा वाहन पलटी झाल्याने आतेभाऊ व मामेबहीण जागीच ठार झाल्याची हृदयद्रावक घटना ३ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर घडली. या घटनेमुळे अंत्री खेडेकर व पांग्री उबरहंडे या दोन्ही गावांवर शोककळा पसरली आहे.
चिखली तालुक्यातील अंत्री खेडेकर येथील रहिवासी समाधान खेडेकर हे आपल्या कुटुंबासह सुरत येथे वास्तव्यास आहेत. देवदर्शनासाठी पत्नी व मुलगी भूमी समाधान खेडेकर (वय २१) हिला घेऊन ते सुरतहून नाशिक येथे बहिणीकडे आले होते. त्यानंतर भूमी आणि बहिणीचा मुलगा शिवम राजेश उंबरहांडे (वय २२, ह.मु. पांग्री उबरहांडे, ता. चिखली) हे दोघे दुचाकीवरून त्र्यंबकेश्वरकडे निघाले होते. तर भूमीचे आई-वडील व इतर नातेवाईक एसटी बसने जात होते.
दरम्यान, नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील गोदावरी नदीच्या पुलावर समोरून भरधाव वेगाने येणारा डब्बरने भरलेला हायवा (क्र. MH-15-JR-4404) चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट दुचाकीवर पलटी झाला. या भीषण अपघातात शिवम व भूमी हे दोघेही जागीच ठार झाले.
अपघाताचे दृश्य पाहून जव्हार चौफुली पोलिस चौकीचे कर्मचारी व स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जेसीबीच्या मदतीने हायवाखाली दबलेल्या दोघांना बाहेर काढले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
दुर्दैवाची बाब म्हणजे शिवमचा २ जानेवारी रोजी वाढदिवस झाला होता. शिवम बीएससी तर भूमी बीए शिक्षण पूर्ण करून पुढील शिक्षण घेत होती. वाढदिवसाचा आनंद आणि देवदर्शनाच्या पवित्र प्रवासातच काळाने झडप घालत दोन्ही होतकरू विद्यार्थ्यांचे आयुष्य हिरावून घेतले. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.












