बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) शाळा, महाविद्यालये, खासगी शिकवणी वर्ग, वस्तीगृह व निर्जन परिसरात महिलांना त्रास देणाऱ्या टवाळखोरांविरोधात बुलढाणा उपविभागात कार्यरत असलेल्या दामिनी पथकाने सरत्या वर्षात जबरदस्त धडाकेबाज कारवाई करत रोडरोमियोंना अक्षरशः सळो की पळो करून सोडले आहे. या कारवाईमुळे महिला व मुलींच्या मनात सुरक्षेची भावना अधिक दृढ झाली आहे.
३१२ जोडप्यांचे समुपदेशन, ३६ जणांवर प्रतिबंधक कारवाई….
जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत दामिनी पथकाने निर्जनस्थळी आढळलेल्या ३१२ जोडप्यांचे समुपदेशन करून त्यांना कडक समज दिली. तसेच छेडछाड व टवाळखोरी करणाऱ्या ३६ जणांवर मुंबई पोलीस कायद्याच्या कलम ११० व ११७ अन्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली.
२५ विधी संघर्षग्रस्त बालकांना दिला सुरक्षित आधार
या मोहिमेदरम्यान आढळून आलेल्या २५ विधी संघर्षग्रस्त बालक व बालिकांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देत पालकांचेही समुपदेशन करण्यात आले. त्यामुळे भविष्यात अशा घटनांना आळा बसण्यास मदत झाली आहे.
२४ तास तत्पर दामिनी पथक….
पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि एसडीपीओ सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथक प्रमुख महिला पोलीस अंमलदार गंगा सुरडकर यांच्यासह पथकातील सदस्यांनी बुलढाणा उपविभागातील ८ पोलीस स्टेशन हद्दीत नियमित गस्त घालत महिलांना तात्काळ मदत पुरवली.
शाळा–कॉलेजात जनजागृती, स्वसंरक्षणाचे धडे
शाळा, महाविद्यालये, वस्तीगृहे व खासगी शिकवणी वर्गांना भेटी देत महिलांवरील अत्याचार, छेडछाड याविषयी जनजागृती करण्यात आली. तसेच मुलींना स्वतःच्या रक्षणाचे महत्त्वाचे धडे देण्यात आले.
भय न बाळगता संपर्क साधा – दामिनी पथकाचे आवाहन…
“घरंदाज महिला अनेकदा तक्रार देण्यास कचरतात. त्यामुळे गुन्हेगारांची हिंमत वाढते. कोणतीही भीती न बाळगता थेट दामिनी पथकाशी संपर्क साधावा,” असे आवाहन पथक प्रमुख गंगा सुरडकर यांनी केले आहे.
परिणाम स्पष्ट : टवाळखोरीला लगाम…!
या प्रभावी कारवाईमुळे बुलढाणा शहरासह उपविभागातील सार्वजनिक ठिकाणी महिलांना त्रास देणाऱ्यांची संख्या लक्षणीयरीत्या घटली असून नारी सुरक्षेच्या दिशेने दामिनी पथक आशेचा किरण ठरत आहे.












