मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज): मेहकर तालुक्यातील जानेफळ पोलीस स्टेशन हद्दीतील आदिवासी बहुल माळेगाव येथे मंगळवारी सकाळी हृदयद्रावक घटना घडली. सासरच्या जाचाला कंटाळून 21 वर्षीय गर्भवती विवाहितेने विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली.
मृत महिलेचे नाव साधना विष्णू चोडकर (वय 21) असून तिचा विवाह 2024 मध्ये झाला होता. सासरच्या लोकांकडून माहेरहून पैसे आणण्याचा सतत तगादा लावला जात होता. या त्रासाला कंटाळून साधनाने आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे.
मंगळवारी सकाळी गावातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत महिलेचा मृतदेह आढळून आला. पोलीस पाटलांनी ही माहिती जानेफळ पोलीस स्टेशनला दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला.
घटनेची माहिती मिळताच मृत महिलेचे माहेर असलेल्या वाकदवाडी (ता. मालेगाव, जि. वाशिम) येथील नातेवाईक माळेगाव येथे दाखल झाले.
“जोपर्यंत पती, सासू आणि सासरे यांना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही,” असा आक्रमक पवित्रा नातेवाईकांनी घेतला.
गावात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलिसांनी तत्पर कारवाई करत सासू-सासऱ्यांना अटक केली. तर पती विष्णू रामाभाऊ चोडकर याला मोबाईल लोकेशनच्या आधारे नगर येथून अटक करण्यात आली.
पोलिसांनी व्हिडीओ कॉलद्वारे अटकेची खात्री नातेवाईकांना दिल्यानंतर दुपारी 4 वाजता मृतदेह ताब्यात घेण्यात आला.
मृतदेह शवविच्छेदनासाठी मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. घटनेच्या तपासासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांनीही माळेगाव येथे भेट दिली. पुढील तपास जानेफळ पोलीस करीत आहेत.












