बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्यूज) – हिवरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पूजेच्या नावाखाली हातचलाखी करून सोने लुबाडणाऱ्या दोन भामट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्या ताब्यातून १० लाख ४१ हजार ३४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई १ ऑक्टोबर रोजी करण्यात आली.
तक्रारीनुसार, खामगाव तालुक्यातील परशुराम लक्ष्मण कांडेलकर (रा. बोथा कोळी) यांना २८ सप्टेंबर रोजी आरोपींनी त्यांच्या मुलाचा हात पाहून “मुलाच्या जीवाला धोका आहे” अशी बतावणी केली. धोका टाळण्यासाठी पूजेचे आयोजन करण्यास सांगितले. घाबरलेल्या कांडेलकर कुटुंबाने पूजेस मान्यता दिली.
पूजेच्या वेळी आरोपींनी घरातील सोन्याचे २१ हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र लोट्यात ठेवण्यास सांगितले. मात्र हातचलाखीने ते चोरले तसेच दक्षिणा म्हणून ५ हजार रुपयेही घेतले. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला.
स्थानिक गुन्हे शाखेने तपास करून तीन आरोपींचा शोध लावला. त्यापैकी सुनील उदयभान मुसळे (३९) व संदीप उत्तम महापुरे (३९, दोघे रा. खांडवा, ता. मोताळा, जि. बुलडाणा) यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून अडीच ग्रॅम सोन्याची पोत, एक कार आणि दोन मोबाईल असा एकूण १० लाख ४१ हजार ३४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थागुशाचे पोलिस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक यशोदा कणसे व त्यांच्या पथकाने केली.











