ऍड शर्वरी रविकांत तुपकर थेट शेतकऱ्यांच्या बांधावर..! अतिवृष्टीग्रस्तांना दिला धिर,शंभर टक्के नुकसान भरपाई द्या -तुपकर

सिंदखेड राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) सिंदखेड राजा तालुक्यातील शेतकरी सध्या अतिवृष्टीच्या मोठ्या संकटाला सामोरे जात आहेत. पावसाने शिवार पाण्याखाली गेले असून, शेतकऱ्यांचे पिक वाचवण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. या भीषण परिस्थितीत शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी व त्यांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी २६ सप्टेंबर रोजी ॲड. शर्वरीताई रविकांत तुपकर यांनी दत्तापूर, धांदरवाडी, भोसा, शेलु, वर्दडी, सोनोशी यासह इतरही गावांना भेट दिली.

या भेटीत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी प्रत्यक्षात पाहिले की सोयाबीन व कपाशीचे पीक पाण्यात बुडाले असून, मोठ्या प्रमाणावर सडले आहे. अनेक ठिकाणी पुराच्या पाण्याने बांध फुटले आहेत, सुपीक माती वाहून गेली आहे, तर काही ठिकाणी विहिरीही वाहून गेल्या आहेत . शेतकऱ्यांच्या मेहनतीचे शिवार अक्षरशः उद्ध्वस्त झाल्याचे चित्र या पाहणीत स्पष्ट दिसून आले.

या वेळी अँड शर्वरीताई तुपकर शेतकऱ्यांशी संवाद साधताना म्हणाल्या –
“या संकटात खचून जाऊ नका. आम्ही तुमच्या सोबत खंबीरपणे उभे आहोत. झालेल्या नुकसानीची सरकारकडून शंभर टक्के भरपाई मिळवून देण्यासाठी आम्ही संघर्ष करू. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आम्ही लढू आणि तुमची व्यथा शासनापर्यंत पोहोचवू.”

तुपकर यांनी पुढे सरकारवर टीका करताना म्हटले की, शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणणारे हे संकट असून, शासनाने जाहीर केलेली मदत अतिशय तुटपुंजी आहे. या मदतीने शेतकऱ्यांचे काहीच भले होणार नाही. शेतकऱ्यांना त्यांच्या झालेल्या नुकसानीची शंभर टक्के भरपाई मिळालीच पाहिजे, अशी त्यांची ठाम व आग्रही मागणी आहे.

भेटीदरम्यान गावोगावी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी आपल्या नुकसानीची वेदना व व्यथा अँड शर्वरीताई तुपकर यांच्यासमोर मांडली. काही शेतकऱ्यांनी जमिनी खरडून गेल्यामुळे आगामी रब्बीच्या पेरणीचाही प्रश्न गंभीर बनल्याचे सांगितले.

संपूर्ण तालुक्यातील परिस्थिती पाहता शेतकरी खचलेले, हतबल व निराश दिसत होते. मात्र अँड शर्वरीताई तुपकर यांच्या उपस्थितीने व दिलेल्या धीराने शेतकऱ्यांच्या डोळ्यात आशेचा किरण पुन्हा दिसू लागला.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!