चिखली (उद्धव पाटील- बुलडाणा कव्हरेज न्यूज): आषाढी एकादशीला पंढरपूर येथे विठ्ठलाचे दर्शन घेऊन खामगावकडे परतणाऱ्या एसटी बसचा सोमवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. ही घटना चिखली-मेहकर फाटा रोडवरील महाबीज समोर रात्री सुमारे २ वाजता घडली. बस क्रमांक एम.एच. ४० वाय ५८३० ही रस्त्याच्या दुभाजकावर आदळून पलटी झाली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
या बस मध्ये चालक आणि वाहकासह एकूण ५३ प्रवासी होते. अपघातात ३० प्रवासी किरकोळ जखमी झाले असून, त्यांना तात्काळ चिखली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, या रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा असला तरी पुरेशा वैद्यकीय सुविधांचा अभाव असल्याने १५ जखमींना पुढील उपचारासाठी बुलडाणा येथील रुग्णालयात हलवण्यात आले.
बुलडाणा येथे हलवण्यात आलेल्या जखमींची नावे खालीलप्रमाणे आहेत:
- भाऊसाहेब शोनाजी धांडे (वय ४५, रा. तळेगाव)
- पुष्पा विनोद शिंगणे (वय ३९, रा. तेल्हारा)
- प्रदीप रघुनाथ धर्मसकर (वय ४८, रा. दहीगाव)
- विठ्ठल तुलसीराम पांडे (वय ३७, रा. तळेगाव)
- रामप्रसाद हरिभाऊ पांडे (वय ६०, रा. तळेगाव)
- सुरेश दिगंबरराव फोकमारे (वय ६०, रा. सवदंरा)
- शोभा झोरे (वय ६०, रा. जानोरी रोड)
- गोविंद वासुदेव पांडे (वय ६०, रा. वडेगाव)
- तुकाराम पांडुरंग कोकरे (वय ६९, रा. बाळापूर)
- ईश्वर हरिचंद्र मोरे (वय ६५, रा. जवळा)
- रुख्मीनाबाई वसंत इंगळे (वय ६२, रा. बाळापूर)
- सुजाता राहुल वानखेडे (वय ३०, रा. चिखली)
- शिवाजी सुभाष जाधव (वय ३२, रा. अन्वा)
- नर्मदा अवचिंतराव मोरे (वय ४५, रा. मिराळवाडी, चिखली)
- आकाश अशोक डोके (वय ४५, रा. मंगरुळ-नवघरे)
सुदैवाने, या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. स्थानिक पोलिसांनी आणि नागरिकांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत जखमींना रुग्णालयात हलवण्यासाठी मदत केली. केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांचे पीआरओ नीरज काकडे यांनीही घटनास्थळी उपस्थित राहून जखमींना रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली.
प्राथमिक माहितीनुसार, चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. एसटी प्रशासनाने या अपघाताची चौकशी सुरू केली असून, चालकाच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडली की अन्य काही कारण होते, याचा तपास सुरू आहे. चिखली पोलिसांनीही घटनास्थळी पंचनामा करून पुढील कारवाई सुरू केली आहे.
1 thought on “BREAKING: पंढरपूरहून परतणाऱ्या एसटी बसचा भीषण अपघात; 15 वारकरी जखमी! चिखली- मेहकर फाटा रोड वर वरील घटना…!”