बुलढाणा (जिमाका:बुलडाणा कव्हरेज न्युज) : महाराष्ट्र शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील ४२ हजार १४४ पात्र शेतकरी लाभार्थ्यांची चौथी यादी १३ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच फार्मर आयडीसह आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत, असे आवाहन जिल्हास्तरीय कर्जमुक्ती समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी केले आहे.
गावातील सूचना फलकांवर लाभार्थी यादी उपलब्ध….
प्रसिद्ध करण्यात आलेल्या लाभार्थी याद्या संबंधित गावातील ग्रामपंचायत कार्यालय, ग्रामसेवा सहकारी संस्थेचे कार्यालय, तलाठी कार्यालय, बँक शाखा आणि सहाय्यक निबंधक कार्यालयांच्या सूचना फलकांवर लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी संबंधित कार्यालयांमध्ये जाऊन यादीचे अवलोकन करावे आणि त्यामध्ये आपले नाव आहे की नाही, याची खात्री करून घ्यावी.
फार्मर आयडी आणि आधारकार्ड आवश्यक…
लाभार्थी यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनी आपला फार्मर आयडी आणि आधारकार्ड सोबत घेऊन जवळच्या ई-सेवा केंद्रात आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी. ज्या शेतकऱ्यांचे आधारकार्ड बँक खात्याशी संलग्न नाही, त्यांनी संबंधित बँक किंवा सहकारी संस्थेशी तातडीने संपर्क साधून आधार क्रमांक बँक खात्याशी जोडून घ्यावा. आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
अडचणी असल्यास तक्रार निवारण समितीकडे दाद मागा….
योजनेच्या अंमलबजावणीदरम्यान पात्र शेतकऱ्यांना काही अडचणी किंवा तक्रारी उद्भवल्यास संबंधित तालुकास्तरीय अथवा जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीकडे दाद मागता येणार आहे. शासनाने निश्चित केलेल्या मुदतीत आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे.
त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकरी बांधवांनी विलंब न करता लाभार्थी यादी तपासावी. फार्मर आयडी, आधार प्रमाणीकरण आणि बँक खाते आधारशी संलग्न करण्यासंदर्भातील आवश्यक कार्यवाही वेळेत पूर्ण करून शासनाच्या कर्जमुक्ती योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी केले आहे.















