बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : दुष्काळामुळे शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असताना त्याला हेक्टरी एक लाख रुपये मदतीची अपेक्षा होती. मात्र, शासनाने दिवाळीसाठी केवळ पाच हजार रुपये मदत जाहीर केल्याने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याची भावना व्यक्त होत आहे. ‘राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला’, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष नरेश शेळके यांनी शासनाच्या निर्णयावर संताप व्यक्त केला. शेतकऱ्यांची क्रूर थट्टा करणाऱ्या सरकारला याची किंमत मोजावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
शासनाच्या या धोरणाचा निषेध करण्यासाठी १९ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रतीकात्मक भोपळा आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरीव आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली. दुष्काळामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत त्याला सावरण्यासाठी हेक्टरी किमान एक लाख रुपये मदत देणे अपेक्षित असताना केवळ पाच हजार रुपयांची मदत जाहीर करणे म्हणजे बळीराजाचा अपमान असल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली.
शेतकऱ्यांच्या हातात मदतीऐवजी भोपळा देणाऱ्या शासनाचा निषेध! या भूमिकेतून करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान नरेश शेळके यांनी शासनाच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली. दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना भरीव मदतीची गरज असताना तुटपुंजी मदत जाहीर करून त्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. शासनाने तातडीने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत द्यावी, तसेच पीकविम्याची रक्कम मंजूर करून ती शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणीही करण्यात आली. या मागण्यांची पूर्तता न झाल्यास आगामी काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शेळके यांनी दिला.
या आंदोलनात जिल्हाध्यक्ष नरेश शेळके, प्रदेश सरचिटणीस बी.टी. जाधव, युवक जिल्हाध्यक्ष सतीश भुतेकर, महिला जिल्हाध्यक्ष वर्षा इंगळे, माजी सभापती लक्ष्मी शेळके, महिला राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य नाझीमा खान, चिखली विधानसभा क्षेत्राध्यक्ष डॉ. ज्योती खेडेकर, डॉ. शरद काळे, पी.एम. जाधव, हभप शंकर महाराज, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत डोंगरदिवे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सईद इकबाल, सेवादल जिल्हाध्यक्ष सुरेश बोंद्रे, जिल्हा प्रवक्ते अमोल भट, ओबीसी जिल्हाध्यक्ष गजानन भिवसनकर, तालुकाध्यक्ष सुनील सोनवणे, बाळासाहेब पवार, सुनील कोल्हे, शहराध्यक्ष अनिल वर्मा, रवींद्र तोडकर, महादेव शेळके, विजय कळवाघे, संजय शिरसाट, गणेश कोरके यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि शेतकरी सहभागी झाले होते.













