Advertisement Advertisement

देऊळगाव घुबेच्या पोरींचा व्हॉलीबॉलमध्ये डंका! सलग तिसऱ्यांदा राज्यस्तरावर धडक! अंतिम सामन्यात यवतमाळला २-१ ने लोळविले; अमरावती विभागावर पुन्हा एकदा वर्चस्व!

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : जिद्द, मेहनत आणि सांघिक खेळाच्या जोरावर देऊळगाव घुबे येथील रामकृष्ण विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या मुलींनी व्हॉलीबॉलच्या मैदानावर पुन्हा एकदा आपला दबदबा निर्माण केला आहे. अमरावती विभागीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत १९ वर्षांखालील मुलींच्या संघाने सलग तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावत राज्यस्तरीय स्पर्धेत धडक मारली आहे. अंतिम सामन्यात यवतमाळच्या संघाला २-१ अशा फरकाने पराभूत करत या मुलींनी शाळेसह बुलढाणा जिल्ह्याचा मान उंचावला आहे.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने १८ ऑक्टोबर २०२६ रोजी अमरावती येथील शासकीय क्रीडा संकुलाच्या मैदानावर विभागीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत रामकृष्ण विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या मुलींनी बुलढाणा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच दमदार खेळाचे प्रदर्शन करत या संघाने अमरावती ग्रामीण आणि अकोला संघांना एकतर्फी पराभूत केले. त्यानंतर अंतिम सामन्यात यवतमाळच्या संघाशी चुरशीची लढत झाली. मात्र, प्रतिस्पर्ध्यांचे आव्हान परतवून लावत बुलढाण्याच्या या रणरागिणींनी २-१ ने विजय मिळवला आणि सलग तिसऱ्यांदा राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरण्याचा बहुमान मिळवला.

या रणरागिणींनी गाजवले मैदान!

विजयी संघामध्ये खुशी जाट, दिव्या काकडे, गौरी घुबे, विशाखा घुबे, शिवकन्या घुबे, पल्लवी घुबे, मयुरी घुबे, सारिका जाधव, श्वेता थुटे, अक्षरा डोके, दिशा गोळे आणि आरती बोर्डे या खेळाडूंनी सहभाग घेतला. खेळाडूंची मेहनत, जिद्द, एकजूट आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन यामुळेच संघाला हे यश मिळाले. सलग तिसऱ्यांदा विभागीय विजेतेपद मिळवून राज्यस्तरावर पोहोचल्याने देऊळगाव घुबे येथील या शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव!

विभागीय स्पर्धेतील या दैदिप्यमान यशाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी आम्रे मॅडम, क्रीडा अधिकारी लांडगे मॅडम तसेच अमरावती विभागाचे विभागीय क्रीडा उपसंचालक गणेशराव जाधव यांनी विजयी संघाचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले. तसेच आगामी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शेनफडराव घुबे, सचिव प्रा. उद्धव घुबे, माजी प्राचार्य हरिदास घुबे, प्राचार्य बबन लांडगे, क्रीडा शिक्षक पंजाबराव गुंजकर, लक्ष्मण घुबे सर आणि प्राचार्य अमोल घुबे यांनीही खेळाडूंचे कौतुक केले. संघाला यश मिळवून देण्यासाठी प्रा. रामेश्वर कऱ्हाडे आणि माजी विद्यार्थी हर्षल घुबे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

सलग तीन वर्षे राज्यस्तरावर धडक मारण्याची किमया साधणाऱ्या रामकृष्ण विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या मुलींनी देऊळगाव घुबेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. आता राज्यस्तरीय स्पर्धेतही याच जिद्दीने आणि आत्मविश्वासाने खेळून यशाची परंपरा कायम ठेवण्याचे आव्हान या संघासमोर आहे. या यशामुळे देऊळगाव घुबे परिसरात आनंदाचे वातावरण असून, जिल्हाभरातून खेळाडूंचे कौतुक होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!