चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात गेल्या काही काळापासून फरार असलेल्या आरोपीला चिखली पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने गुजरात राज्यातून अटक केली आहे. मुस्ताकभाई उस्मानभाई कडीवार (वय ४०, रा. लिंबाडा, ता. वाकानेर, जि. मोरबी, गुजरात) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी गुजरातमधील वाकानेर येथे शोधमोहीम राबवून आरोपीला ताब्यात घेतले.
चिखली पोलीस ठाण्यात २३ जानेवारी २०२५ रोजी आर्थिक फसवणुकीप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम ४०६, ४२० व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपीला यापूर्वीच अटक करण्यात आली होती, तर दुसऱ्या आरोपीला पंढरकवढा येथून ताब्यात घेण्यात आले होते. मात्र, मुस्ताकभाई कडीवार हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. त्याचा शोध घेण्यासाठी चिखली पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न सुरू होते.
दरम्यान, जिल्हा पोलीस दलाच्या फरार व पाहिजे आरोपी शोधमोहीमेदरम्यान चिखली पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने तांत्रिक माहितीचे विश्लेषण केले. तसेच गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी गुजरात राज्यातील मोरबी जिल्ह्यातील वाकानेर येथे असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिस पथकाने तेथे जाऊन कारवाई केली आणि आरोपीला अटक करण्यात यश मिळवले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांच्या आदेशानुसार, चिखली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक शरद भागवतकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल अमोल गवई, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत धंदर, अजय इटावा, राहुल पायघन आणि ज्ञानेश्वर शिंदे यांचा सहभाग होता.














