Advertisement Advertisement

शेतातल्या मीटर पेटीला आग लावल्याचा आरोप, विचारायला गेला अन् मार खाऊन आला! सोनाळ्यात शेतकऱ्यावर लोखंडी रॉडने हल्ला; डोकं, पाठ अन् खांद्यावर वार!

सोनाळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शेतातील बोअरवेलच्या मीटर पेटीला आग लावल्याच्या आरोपावरून झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याची घटना संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा परिसरात १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी घडली. या घटनेत ज्ञानेश्वर खंडू उभे (रा. सोनाळा) हे शेतकरी जखमी झाले आहेत. याप्रकरणी अहमद खा साहेब खा आणि मुजाहीद खा अहमद खा (दोघे रा. सोनाळा) यांच्याविरुद्ध सोनाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर उभे हे १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी आपल्या संत्र्याच्या शेताची पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्या शेतातील बोअरवेलजवळ असलेल्या मीटर पेटीला आग लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अहमद खा साहेब खा हे मीटर पेटीला आग लावत असल्याचे आपण पाहिल्याचा आरोप ज्ञानेश्वर उभे यांनी तक्रारीत केला आहे. या घटनेबाबत विचारणा करण्यासाठी ते आरोपींच्या घरी गेले असता, तेथे वाद निर्माण झाला.

तक्रारीनुसार, या वादादरम्यान पहिल्या आरोपीने ज्ञानेश्वर उभे यांच्या तोंडावर बुक्क्याने मारहाण केली, तर दुसऱ्या आरोपीने लोखंडी रॉडने त्यांच्या डोक्यावर, पाठीवर आणि खांद्यावर वार करून त्यांना जखमी केले. हा प्रकार संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा परिसरातील सायखेड शेतशिवारात, गट क्रमांक २२१ मधील शेताच्या संदर्भात घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी सोनाळा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २९२/२०२६ अन्वये दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महादेव खोने करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!