चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : चिखली तहसील कार्यालयांतर्गत गोदरी बीटमध्ये तलाठी म्हणून कार्यरत असलेले पियुष पांडुरंग गायकवाड (वय २६, रा. दहिद बुद्रुक, ह. मु. सरस्वतीनगर, चिखली) यांचा बुधवारी, १४ ऑक्टोबर रोजी राहत्या घरी मृत्यू झाल्याची घटना समोर आली. या घटनेमुळे महसूल विभागासह चिखली शहरात हळहळ व्यक्त होत असून, त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
पियुष गायकवाड हे सरस्वतीनगर येथे आईसोबत राहत होते. बुधवारी सकाळी आईच्या हस्ते जेवण केल्यानंतर त्यांनी आराम करण्यासाठी खोलीत प्रवेश केला. बराच वेळ होऊनही खोलीचा दरवाजा न उघडल्याने दुपारी सुमारे दोन वाजताच्या सुमारास हा प्रकार निदर्शनास आला. त्यानंतर संबंधितांना घटनेची माहिती देण्यात आली.
पियुष गायकवाड हे काही काळापासून पुणे येथे एमपीएससी परीक्षेची तयारी करीत होते. काही दिवसांपूर्वीच ते पुण्याहून चिखली येथे आपल्या घरी परतले होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. महसूल विभागात तलाठी म्हणून कार्यरत असलेल्या या तरुणाच्या आकस्मिक मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, त्यांच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेबाबत पोलिसांकडून पुढील माहिती घेतली जाण्याची अपेक्षा असून, वृत्त लिहिपर्यंत चिखली पोलीस ठाण्यात अधिकृत नोंद झाल्याची माहिती उपलब्ध नव्हती.













