बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने आगामी काळात पशुधनासाठी चाराटंचाईचे संकट उभे राहण्याची शक्यता आहे. हे संकट वेळीच ओळखून जिल्हा प्रशासनाने चारा नियोजन आणि संवर्धनासाठी उपाययोजना हाती घेतल्या आहेत. उपलब्ध चारा संसाधनांचे संरक्षण करणे, चाऱ्याचा काटकसरीने वापर करणे आणि चारा पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी संबंधित विभागांना आवश्यक निर्देश दिले आहेत.
जिल्ह्यातील पशुधनाला भविष्यात चाराटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी वनक्षेत्रातील उपलब्ध गवत आणि चारा राखीव ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वनक्षेत्रातील गवताची अनधिकृत कापणी, वाहतूक किंवा विल्हेवाट होणार नाही, यासाठी वन विभागाने कडक देखरेख ठेवावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तसेच चारा संवर्धन आणि त्याच्या योग्य वितरणासाठी वन विभागाने पशुसंवर्धन विभागाशी समन्वय साधून नियोजनबद्ध कार्यवाही करण्यावर भर देण्यात आला आहे.
ज्वारी-मक्याच्या चारा बियाण्यांचा पुरवठा….
चारा उपलब्धता वाढविण्यासाठी विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पांतर्गत बुलढाणा जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात चारा बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामध्ये २१ हजार किलो चारा ज्वारीचे आणि ५६ हजार किलो मक्याचे, असे एकूण ७७ हजार किलो बियाणे मिळणार आहे. या बियाण्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात चारा पिकांची लागवड वाढविण्यास मदत होणार असून, आगामी काळात पशुधनासाठी चारा उपलब्ध ठेवण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा उपाय ठरणार आहे.
दुष्काळसदृश परिस्थितीत पशुधनाचे संगोपन आणि पशुपालकांचे हित जपण्यासाठी चारा संसाधनांचे संरक्षण करणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने आणि गांभीर्याने काम करावे, असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. त्याचबरोबर शेतकरी आणि पशुपालकांनी उपलब्ध चाऱ्याचा काटकसरीने व योग्य पद्धतीने वापर करून चारा संवर्धनाच्या उपाययोजनांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.















