Advertisement Advertisement

बाप म्हणावं की कसाई! पोटच्या पोरीवरच वाईट नजर टाकली! दारूच्या नशेत बापानंच काळिमा फासला! १६ वर्षांच्या लेकीचा विनयभंग करणाऱ्या बापाला न्यायालयानं ठोकल्या ३ वर्षांच्या सश्रम कारावासाच्या शिक्षा!

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : आपल्याच १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिचा छळ करणाऱ्या वडिलांना बुलढाणा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश-३ तथा विशेष पोक्सो न्यायालयाचे न्यायाधीश श्री. रविकुमार केशरमल शर्मा यांनी दोषी ठरवत ३ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच आरोपीला एकूण २ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच दंडाच्या रकमेतील २ हजार रुपये पीडितेला नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

आईच्या निधनानंतर मुलीचा छळ…..

या प्रकरणातील पीडित मुलगी चिखली शहरातील खामगाव चौफुली परिसरात राहते. तिच्या आईचे २०१८ मध्ये निधन झाले होते. त्यानंतर आरोपी वडील (वय ३८ वर्षे) हा वारंवार दारूच्या नशेत घरी येऊन मुलीला मारहाण व त्रास देत असल्याचे तपासात समोर आले. लहान भावाचे वय आणि वडिलांची भीती यामुळे पीडिता बराच काळ गप्प राहिली होती. मात्र, १४ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी सुमारे १.३० वाजता आरोपीने दारूच्या नशेत घरी येऊन तिचा विनयभंग केला. पीडितेने आरडाओरड केल्यानंतर शेजाऱ्यांनी धाव घेत तिची सुटका केली. त्यानंतर तिने चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

चार महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष…..

या प्रकरणी चिखली पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) आणि लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण कायदा (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. सरकार पक्षातर्फे प्रमुख जिल्हा सरकारी वकील वसंत लक्ष्मण भटकर यांनी प्रभावी युक्तिवाद केला. या खटल्यात सरकार पक्षाने चार महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंदवली. उपलब्ध पुरावे आणि साक्षींच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून तीन वर्षे सश्रम कारावास आणि एकूण २ हजार ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

पीडितेला नुकसानभरपाई; अतिरिक्त मदतीसाठी प्रकरण वर्ग….

दंडाच्या रकमेतून २ हजार रुपये पीडितेला नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. याशिवाय, पीडितेला अतिरिक्त आर्थिक मदत मिळण्याच्या दृष्टीने हे प्रकरण विधी सेवा प्राधिकरण, बुलढाणा यांच्याकडे वर्ग करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले. या खटल्यात पोलीस उपनिरीक्षक नितीनसिंह चव्हाण यांनी तपास अधिकारी म्हणून काम पाहिले. तर न्यायालयीन कामकाजात पोलीस हेड कॉन्स्टेबल नंदाराम इंगळे आणि पोलीस कॉन्स्टेबल रामेश्वर भांडेकर यांनी सहकार्य केले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!