सिंदखेड राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): अल्पवयीन मुलीचा विवाह केल्याप्रकरणी सिंदखेड राजा पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहाच्या वेळी मुलीचे वय अवघे १७ वर्षे ७ महिने असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात विवाह करणारा पुरुष, मुलीची आई, विवाहविधी पार पाडणारे भटजी आणि संबंधित मंगल कार्यालयाचे मालक किंवा व्यवस्थापक यांच्याविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक अधिनियम, २००६ मधील कलम ९, १० आणि ११ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी मुख्यसेविका किरण शिवशंकर गुंजकर यांनी ९ ऑक्टोबर २०२६ रोजी पोलिसांकडे लेखी तक्रार दिली.
प्रथम माहिती अहवालातील तक्रारीनुसार, संबंधित मुलीचा विवाह ७ मे २०२६ रोजी दुपारी २ वाजून ४५ मिनिटांनी सिंदखेड राजा येथील लहान राजवाडा येथे झाल्याचे नमूद आहे. विवाहाच्या वेळी मुलगी इयत्ता अकरावीत शिक्षण घेत होती. बालकल्याण समिती, बुलढाणा यांच्या २७ सप्टेंबर २०२६ रोजीच्या पत्राचा संदर्भही तक्रारीत देण्यात आला आहे. चाइल्ड हेल्पलाइनच्या माध्यमातून संबंधित मुलीला संरक्षणात घेऊन शासकीय मुलींच्या बालगृहात दाखल करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
चौकशीनंतर प्रकरण आले समोर….
या प्रकरणाच्या अनुषंगाने ३ ऑक्टोबर २०२६ रोजी संबंधित मुलीच्या घरी भेट देऊन चौकशी करण्यात आली. उपलब्ध कागदपत्रे आणि पुराव्यांच्या आधारे मुलीचा विवाह अल्पवयात झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर मुख्यसेविका किरण गुंजकर यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. बालविवाह रोखण्यासाठी असलेल्या कायद्याचे उल्लंघन झाल्याचा आरोप या प्रकरणातून समोर आला आहे.
इतरांचा सहभाग आढळल्यास कारवाईची मागणी….
या प्रकरणात विवाह करणारा पुरुष, मुलीची आई, विवाहविधी पार पाडणारे भटजी तसेच मंगल कार्यालयाचे मालक किंवा व्यवस्थापक यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. याशिवाय, तपासादरम्यान अन्य कोणत्याही व्यक्तीचा सहभाग निष्पन्न झाल्यास त्यांच्यावरही कायद्यानुसार कारवाई करावी, अशी विनंती करण्यात आली आहे. ९ ऑक्टोबर रोजी सिंदखेड राजा पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. संबंधितांवरील आरोप अद्याप न्यायालयात सिद्ध झालेले नाहीत.














