Advertisement Advertisement

चोरट्यांना ना कुलपाची भीती, ना कडीकोंड्याची! सावखेड नागरेत तीन घरांना केलं लक्ष्य! घरात घुसून रोकड अन् दागिने केले गायब! भरदिवसा चोरीनं गावात खळबळ उडाली! ९८ हजारांचा मुद्देमाल घेऊन चोरट्यांनी ठोकली धूम!

मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्युज) : देऊळगाव राजा तालुक्यातील सावखेड नागरे येथे अज्ञात चोरट्यांनी एकाच दिवशी तीन घरांना लक्ष्य करत रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ६ ऑक्टोबर रोजी दुपारी २ ते सायंकाळी ५.३० वाजेदरम्यान ही घरफोडी झाली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अंढेरा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बद्रीनाथ नामदेव नागरे (वय ५५, व्यवसाय शेती, रा. सावखेड नागरे) यांच्या घराच्या मागील दरवाजाची कडीकोंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. त्यानंतर कपाटात ठेवलेली १६ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. त्याचप्रमाणे सुभाष नामदेव नागरे यांच्या घराचे कुलूप तोडून डब्यात ठेवलेली ४ हजार ५०० रुपयांची रोकड लंपास केली.

तिसऱ्या घटनेत नारायण ठमाजी नागरे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील १२ ग्रॅम वजनाची सोन्याची एकदाणी, किंमत ३६ हजार रुपये, सात ग्रॅम वजनाची बदामी सोन्याची अंगठी, किंमत २१ हजार रुपये, तसेच २० हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली. अशा प्रकारे तिन्ही घरांमधून एकूण ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी ८ ऑक्टोबर रोजी अंढेरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार पोफळे आणि पोलीस कॉन्स्टेबल किशोर जाधव यांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(३) व ३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिनेश घुगे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Latest Stories

Leave a Comment

WhatsApp Join Group!