Advertisement Advertisement

CRIME REPORT:देऊळगाव राजात जुन्या वादाचा भडका!दोन गटांत राडा, दोघांचा खून; ३९ आरोपींसह ५५ अनोळखी रडारवर….

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शहरातील भोलेशहा दर्याजवळ ५ ऑक्टोबर रोजी जुन्या वादातून दोन गटांत झालेल्या तुफान हाणामारीत दोघांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली. या घटनेत शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक अनवर उर्फ अनु शेख अली आणि अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आसिफ उर्फ आरिफ हारुण पठाण यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात दोन्ही बाजूंनी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, एकूण ३९ आरोपी आणि तब्बल ५५ अनोळखी व्यक्तींचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख मुजाहिद शेख अली यांच्या तक्रारीवरून दाखल गुन्ह्यात शाहरुखखान अहमदखान, सलमान खान अहमदखान, आसिफ उर्फ आरिफ हारुण पठाण, सय्यद मोबीन सय्यद आलम, सय्यद मुजम्मील सय्यद रहीम यांच्यासह अनेक जणांवर आरोप करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, आरोपींनी एकत्र जमून पूर्वनियोजित पद्धतीने हल्ला केल्याचा आरोप आहे. या घटनेत अनवर उर्फ अनु शेख अली यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेतील खून, कट रचणे, बेकायदेशीर जमाव, मारहाण व धमकीसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, दुसऱ्या गटाकडून शेख अतिक शेख उमर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अन्नु माया उर्फ शेख अनवर अली, शेख अकीब शेख पाशु, शेख अल्ताप शेख पाशु, अकबर बागवान इस्माईल बागवान, शेख सलमान शेख उस्मान, शेख फरीद शेख बिबन यांच्यासह अनेक आरोपींवर आरोप करण्यात आले आहेत. तक्रारीनुसार, संबंधितांनी हत्यारांसह जमाव करून घरात तसेच घराबाहेर हल्ला केला. या घटनेत आसिफ उर्फ आरिफ हारुण पठाण गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच शेख अस्लम शेख युसूफ, वसीम खान कयुम खान यांच्यासह इतर नातेवाईकांना दुखापत झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या दोन्ही घटनांमध्ये जुन्या वादाची पार्श्वभूमी असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले असून, दोन्ही गटांनी एकमेकांवर हल्ल्याचे गंभीर आरोप केले आहेत. घटनेनंतर जखमींना देऊळगाव राजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय प्रमाणपत्र तसेच फिर्यादींच्या तोंडी जबाबाच्या आधारे पोलिसांनी दोन्ही बाजूंविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हे दाखल केले आहेत.

या प्रकरणामुळे देऊळगाव राजा शहरात मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे. दोन्ही गुन्ह्यांमध्ये आरोपींची संख्या मोठी असून, अनोळखी व्यक्तींचाही सहभाग नमूद करण्यात आला आहे. या दुहेरी खून प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक ब्रह्मा गिरी करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!