Advertisement Advertisement

देऊळगाव राजात कव्वालीच्या कार्यक्रमात रक्तरंजित हाणामारी; दोघांचा मृत्यू! बसण्याच्या जागेवरून सुरू झालेला वाद विकोपाला; तलवारी व धारदार शस्त्रांचा वापर, सात जण जखमी….

देऊळगावराजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : देऊळगावराजा शहरात ५ ऑक्टोबरच्या रात्री कव्वालीच्या कार्यक्रमादरम्यान बसण्याच्या जागेवरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर तुंबळ हाणामारीत झाले. या घटनेत दोन्ही गटांकडून तलवारी आणि धारदार शस्त्रांचा वापर झाल्याची प्राथमिक माहिती असून, या हिंसक घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक अन्वर शेख (३८) तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाशी संबंधित नगरसेवक पतीच्या समर्थकाचा समावेश असल्याची माहिती आहे. दुसऱ्या मृत व्यक्तीचे नाव आरिफ पठाण असल्याचे समजते.

प्राप्त माहितीनुसार, देऊळगावराजा शहरात ५ ऑक्टोबर रोजी रात्री कव्वालीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम सुरू असताना लहान मुलांच्या बसण्याच्या जागेवरून सुरुवातीला काही जणांमध्ये वाद झाला. हा वाद पुढे वाढत गेला आणि त्यातून दोन गट आमनेसामने आले. नगरसेवक अन्वर शेख आणि नगरसेवक पती आतिक शेख यांच्याशी संबंधित समर्थकांमध्ये हा वाद झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी तलवारी आणि धारदार शस्त्रांचा वापर झाल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात अन्वर शेख आणि आरिफ पठाण यांचा मृत्यू झाला. दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेत सुमारे सात जण जखमी झाले असून, जखमींना उपचारासाठी जालना आणि छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच देऊळगावराजा पोलिसांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी शहरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. घटनेमागील नेमके कारण काय, हाणामारीत कोण-कोण सहभागी होते आणि दोघांच्या मृत्यूला नेमकी कोणती परिस्थिती कारणीभूत ठरली, याचा तपास पोलीस करीत आहेत. पोलिसांच्या तपासानंतरच घटनेचे नेमके चित्र स्पष्ट होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!