चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : चिखली तालुक्यातील शेळगाव अटोळ गावाचा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत होणारा पाणीपुरवठा मागील काही महिन्यांपासून पूर्णपणे बंद असल्याने गावात पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. त्यातच सध्या दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने आगामी काळात पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गावाचा पाणीपुरवठा तातडीने सुरू करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ. विकास मिसाळ आणि उपसरपंच संतोष बोर्डे यांनी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शेळगाव अटोळ गावाला प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून ही योजना बंद असल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या पावसाने ओढ दिल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, भविष्यात पाणीटंचाईचे संकट आणखी गडद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाने वेळीच दखल घेऊन गावाचा पाणीपुरवठा तातडीने सुरू करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
प्रशासनाने तात्काळ पाणीपुरवठा सुरू न केल्यास प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या पाण्याच्या टाकीवर चढून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा डॉ. विकास मिसाळ आणि उपसरपंच संतोष बोर्डे यांनी दिला आहे. या आंदोलनातून उद्भवणाऱ्या परिस्थितीला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, असेही त्यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे.
यावेळी माजी तंटामुक्ती अध्यक्ष शरद गावडे आणि रमेश मिसाळ उपस्थित होते. आता प्रशासन या मागणीची कितपत दखल घेते आणि शेळगाव अटोळचा बंद पडलेला पाणीपुरवठा कधी सुरू होतो, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.














