बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी चिखली तालुक्यातील किन्होळा येथील ५६ वर्षीय आरोपीला न्यायालयाने एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. साहेबराव सुपडा नाटेकर असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव असून, अतिरिक्त सत्र न्यायालय क्रमांक २ चे न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश अशोक संतानी यांनी हा निकाल दिला. आरोपीला दोन हजार रुपये दंडही ठोठावण्यात आला आहे.
ही घटना २१ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली होती. पीडित अल्पवयीन मुलगी बकरी पाहण्यासाठी आरोपी साहेबराव नाटेकर याच्या घरासमोरून जात होती. यावेळी बकरी आरोपीच्या अंगणात झाडाची पाने खात असल्याचे तिच्या निदर्शनास आले. त्यावेळी अंगणात आंघोळ करीत असलेल्या आरोपीने मुलीचा विनयभंग केला. मुलीने आरोपीच्या हाताला झटका देत तेथून पळ काढला आणि रडत घरी जाऊन आईला घडलेला प्रकार सांगितला. यापूर्वीही आरोपीने तीन ते चार वेळा हाताने व मानेने इशारे करून तिला घरी बोलावण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते.
मुलीच्या वडिलांनी घरी परतल्यानंतर चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या कलम ७४, ७५ (२), ७९ तसेच पोक्सो कायद्याच्या कलम ८ व १२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड. वसंत भटकर यांनी सात साक्षीदार तपासले. यामध्ये पीडित मुलगी, तिचे वडील, घटनास्थळ पंच, तपास अधिकारी आणि इतर साक्षीदारांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या.
सरकार पक्षाचा युक्तिवाद आणि साक्षीपुरावे विचारात घेऊन न्यायालयाने आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध झाल्याचे मान्य केले. त्यानंतर न्यायाधीश अशोक संतानी यांनी आरोपी साहेबराव नाटेकर याला कलम ७९ आणि पोक्सो कायद्यांतर्गत एक वर्ष सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणाच्या तपासात एपीआय स्वप्नील तायडे व पीएसआय प्रमोद हुसे यांनी काम पाहिले, तर कोर्ट पैरवी म्हणून पोहेकॉ नंदाराम इंगळे यांनी सरकार पक्षाला मदत केली.















