चिखली(बुलडाणा कव्हरेज न्युज): शेलोडी येथील खातेदार शेतकऱ्यांचे बँक व्यवहार पूर्वीप्रमाणे शेलसूर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) शाखेतच सुरू ठेवण्यात यावेत, या मागणीसाठी क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. अॅड. शर्वरी तुपकर आणि विनायक सरनाईक,अरुण नेमाने यांच्या नेतृत्वाखाली ही मागणी करण्यात आली. प्रशासनाकडून शेलसूर येथील स्टेट बँकेतील व्यवहार पूर्ववत करण्याचे आश्वासन देण्यात आले.
शेलोडी येथील अनेक खातेदार शेतकऱ्यांचे अनेक वर्षांपासूनचे बँक व्यवहार शेलसूर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतूनच होत आहेत. कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांचे व्यवहारही याच शाखेत झाले आहेत. खाते उघडल्यापासून शेतकऱ्यांचे नियमित व्यवहार शेलसूर शाखेतच सुरू आहेत. शेलसूर हे गाव शेलोडीपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर आहे.
मात्र,अचानकपणे हे बँक व्यवहार उदयनगर येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक (विदर्भ-कोकण) शाखेकडे वळविण्यात आले आहेत. उदयनगर हे शेलोडीपासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर असल्याने बँकेच्या कामासाठी शेतकऱ्यांना मोठा प्रवास करावा लागत आहे. शेतीच्या कामात व्यस्त असलेल्या शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा यामुळे खर्च होत असून, जवळची बँक उपलब्ध असताना दूरच्या शाखेत व्यवहार वळविण्याचा निर्णय शेतकऱ्यांसाठी गैरसोयीचा ठरत असल्याचे शेतकऱ्यांनी निवेदन म्हटले आहे.त्यामुळे शेलोडी येथील खातेदार शेतकऱ्यांची होणारी हेळसांड थांबवून त्यांचे बँक व्यवहार पूर्वीप्रमाणे शेलसूर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतच सुरू करण्यात यावेत,अशी मागणी करण्यात आली. प्रशासनानेही शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन व्यवहार पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अरुण नेमाने, तुळशीदास घाडगे, अमोल नेमाने, श्रीकृष्ण नेमाने, सुभाष तावरे, सतीश जाधव, संतोष रक्ताडे, रामेश्वर शेवाळे, परमेश्वर रकताडे, प्रभाकर पोटे, डिंगबर गायकवाड, हरिदास जाधव, बळीराम मोरे, केशव जाधव, विनोद नेमाने, अविनाश तावरे, अशोक नेमाने, पांडुरंग नेमाने, उद्धव नेमाने, विष्णू चव्हाण, बबन नेमाने, राजू नेमाने, नागेश सोळंकी यांच्यासह शेलोडी येथील खातेदार शेतकरी उपस्थित होते.
मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा!
शेतकऱ्यांची गैरसोय दूर करून शेलसूर येथील स्टेट बँकेतील व्यवहार पूर्ववत करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. या आश्वासनाची तातडीने पूर्तता करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. अन्यथा मागणीची पूर्तता न झाल्यास क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा विनायक सरनाईक यांच्यासह शेलोडी येथील खातेदार शेतकऱ्यांनी निवेदनाव्दारे देण्यात आला आहे.














