बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) बुलढाणा जिल्ह्यातील भाजप आमदार श्वेताताई महाले आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. श्वेता महाले यांनी ‘बुलढाण्याचा बिहार झाला असून, पुन्हा शांत बुलढाणा करायचा आहे,’ अशी टीका केल्यानंतर आमदार संजय गायकवाड यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
“बुलढाण्याचा बिहार झाला, असे म्हणण्यापूर्वी किमान इतिहास तपासला पाहिजे. आरोप करताना तथ्य पाहिले पाहिजे,” असा टोला संजय गायकवाड यांनी लगावला. महिलांच्या सुरक्षेसाठी आपण काम केल्याचा दावा करत त्यांनी आपल्या कार्याचा दाखला दिला.
“ज्या व्यक्तीने महिलांच्या रक्षणासाठी स्वतःचे रक्त सांडले, अंगावर तलवारीचे वार झेलले, त्या व्यक्तीवर अशाप्रकारे आरोप करून बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असे गायकवाड म्हणाले. तसेच, “साडेसात हजार मुलींचे संसार वाचवले,” असा दावाही त्यांनी केला. जिल्ह्यातून पळून गेलेल्या अनेक मुलींना परत आणल्याचे आणि अडीचशेपेक्षा अधिक ‘लव्ह जिहाद’ प्रकरणांमध्ये हस्तक्षेप केल्याचेही त्यांनी सांगितले. या संख्यांबाबत स्वतंत्र अधिकृत पडताळणी उपलब्ध नसल्याने हे दावे गायकवाड यांच्या वक्तव्यापुरतेच आहेत.
बुलढाण्यातील महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित करत गायकवाड म्हणाले, “आज माझ्या बुलढाण्यात रात्री बारा वाजताही एक महिला एकटी फिरू शकते. असा बुलढाणा जर बिहार वाटत असेल, तर मला त्यांच्या बुद्धीची कीव येते.”
दरम्यान, श्वेताताई महाले यांनी बुलढाणा मतदारसंघातील एका सत्कार कार्यक्रमात बोलताना जिल्ह्यात हुकूमशाही आणि दडपशाही चालणार नसल्याचे म्हटले होते. तसेच, कार्यक्रमाच्या आयोजकाच्या पत्नीला उचलून नेण्याची आणि गायब करण्याची भाषा करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला होता.
या वक्तव्यावरून महाले आणि गायकवाड यांच्यातील राजकीय वाद आणखी तीव्र झाला आहे. गेल्या काही काळापासून दोन्ही आमदारांकडून एकमेकांवर टीका-प्रत्यारोप सुरू असून, आता ‘बुलढाण्याचा बिहार’ या वक्तव्यामुळे हा वाद पुन्हा चर्चेत आला आहे.
















