Advertisement Advertisement

विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट; ११ साऊंड मालकांवर गुन्हे! जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली; खामगाव, मलकापूर आणि मोताळ्यात पोलिसांची कारवाई….

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या कर्कश आवाजाला जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बंदी असतानाही अनेक गणेश मंडळांच्या मिरवणुकीत मोठ्या आवाजात डीजे वाजविण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी खामगाव, मलकापूर आणि मोताळा परिसरात पोलिसांनी कारवाई करत एकूण ११ डीजे व साऊंड मालकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

खामगाव शहरात चार डीजे मालकांवर कारवाई : खामगाव शहरातील केडिया टर्निंग परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान कर्कश आवाजात डीजे वाजविल्याप्रकरणी नरेश रमेश पाटील (रा. भामरे बु., ता. चाळीसगाव), आकाश राजू चौधरी (रा. बोदवड, जि. जळगाव), अथर्व गजानन पाचपोर (रा. बाळापूर रोड, अकोला) आणि संदीप सुभाष पाटील (रा. देवपूर, धुळे) यांच्याविरुद्ध खामगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस कर्मचारी आशिषसिंह ठाकूर यांच्या तक्रारीवरून ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ अन्वये ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, हिवरखेड पोलिसांनी उमरा अटाळी येथील विसर्जन मिरवणुकीत ट्रॅक्टरवर कर्कश आवाजात डीजे वाजविल्याप्रकरणी ट्रॅक्टर मालक प्रतीक साहेबराव धनोकार याच्याविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे.

मलकापूरमध्ये सहा डीजे मालक अडकले : मलकापूर शहरातील विविध गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीत मोठ्या आवाजात डीजे वाजविल्याप्रकरणी सहा साऊंड मालकांवर कारवाई करण्यात आली. विकास नगर श्री शंभू गणेश मंडळाच्या मिरवणुकीतील डीजे मालक भारत विनायक पाटील, गजानन नगर मित्र मंडळाच्या मिरवणुकीतील कानू ज्ञानदेव भारसाकळेरा, शिवशक्ती गणेश मंडळाच्या मिरवणुकीतील मनोज आप्पा मालचे, छत्रपती शिवाजी गणेश मंडळाच्या मिरवणुकीतील कल्पेश उखंडा राठोड आणि वैभव दादाराव खोडके यांच्याविरुद्ध मलकापूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच मलकापूर ग्रामीण पोलिसांनी उमाळी येथील नवयुवक गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत कर्कश आवाजात डीजे वाजविल्याप्रकरणी वियोगी साऊंडचे विवेक ज्ञानदेव उखाडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मोठ्या आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, लहान मुले यांना त्रास होत असल्याच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.

मोताळ्यात पोलिसांचा धडक कारवाईचा बडगा : बोराखेडी पोलिसांनी तांदुळवाडी येथील सिद्धार्थवाडी परिसरात कारवाई करत साऊंड मालक संतोष ज्ञानदेव वाढे (रा. आदर्श नगर, मोताळा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. रविवार, २७ सप्टेंबर रोजी श्री गजानन मित्र मंडळाच्या परिसरात मोठ्या आवाजात साऊंड सिस्टीम सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे ‘दिशांत साऊंड’चे वाहन क्रमांक एमएच-०४ एफजे-२११४ लावून साऊंड वाजविला जात असल्याचे आढळले. पोलिसांनी परवान्याबाबत विचारणा केली असता संबंधिताकडे अधिकृत परवाना नसल्याचे समोर आले. साऊंड बंद करण्याच्या सूचना देऊनही सायंकाळी ७ ते रात्री ९.३० वाजेपर्यंत साऊंड सुरू ठेवण्यात आल्याने पोहेकॉ. सुपडसिंग चव्हाण यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २२३ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कपले करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!