सिंदखेडराजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): पावसाने पाठ फिरवल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने २३ सप्टेंबर रोजी सिंदखेडराजा तहसील कार्यालयासमोर तीव्र अर्धनग्न रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनातून शासनाचे लक्ष शेतकऱ्यांच्या गंभीर परिस्थितीकडे वेधण्यात आले.
जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यामुळे सोयाबीन, तूर, कापूस, उडीद यासह खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे सिंदखेडराजा व देऊळगावराजा तालुक्यांसह संपूर्ण बुलढाणा जिल्हा तातडीने कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
एकरी ५० हजारांची मदत अन् १०० टक्के पीक विम्याची मागणी…..
नुकसान झालेल्या पिकांची तातडीने पाहणी करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, १०० टक्के पीक विमा मंजूर करावा आणि प्रत्येक शेतकऱ्याला एकरी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहून तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.
शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच ठेवण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला. आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नरेश शेळके, विधानसभा अध्यक्ष जगन सहाणे, नगराध्यक्ष सौरभ तायडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ॲड. योगेश नाईक, सतीश भुतेकर, गजानन चित्ते, आदित्य काटे, राहुल शेळके यांच्यासह मतदारसंघातील तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, बाजार समितीचे सभापती व सदस्य तसेच पक्षाचे पदाधिकारी आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.














