उदयनगर (बुलडाणा कव्हरेज न्युज): पिकविमा त्वरित मिळावा, चिखली तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा, कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये आर्थिक मदत द्यावी, आदी मागण्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने १९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता नागपूर-पुणे महामार्गावरील वैरागड बस थांब्यावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. अमोल तोंडे, संतोष खडसे व आकाश राऊत यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शेतकऱ्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले.
यंदाच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. अत्यल्प पावसामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा सामना करावा लागला. त्यानंतर गेल्या ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतातील उभी सोयाबीनसह इतर पिके पाण्याअभावी करपू लागली आहेत. त्यामुळे उत्पादन हातातून जाण्याची भीती निर्माण झाल्याने शेतकरी वर्ग मेटाकुटीस आला आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीने पिकविम्याची रक्कम मिळावी, चिखली तालुका दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट करावा, कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि हेक्टरी एक लाख रुपये आर्थिक मदत द्यावी, अशा मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या. आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी शेतातील करपलेली सोयाबीनची झाडे सोबत आणून ती महामार्गावरील वैरागड बस थांब्यावर फेकून देत सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. दुष्काळाची गंभीर दखल घेऊन शेतकऱ्यांना दुष्काळातील सवलतींचा लाभ तसेच तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
आंदोलनानंतर अमडापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार राजपूत यांना शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या आंदोलनात गोविंदा मोरे, विजय तोंडे, अभिमन्यू शेळके, विष्णू मानमोडे, उद्धव साठे, कृष्णा कोकाटे, एकनाथ शेळके, विकी तोंडे, ज्ञानबा पवार, विशाल घगे, कृष्णा डोंगरे, अनिल तोंडे, अशोक टापरे, सुलताने यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी सहभागी झाले होते.














