लोणार (दिपक कायंदे- बुलडाणा कव्हरेज न्यूज): तालुक्यातील येवती गावच्या सरपंच प्रयागबाई पाटोळे यांच्याविरोधात दाखल झालेला अविश्वास ठराव मंगळवार, दि. १ जुलै २०२५ रोजी विशेष सभेत मंजूर झाला. यामुळे सरपंच प्रयागबाई पाटोळे यांना आपले पद सोडावे लागले आहे. या सभेचे अध्यक्षस्थान तहसीलदार भूषण पाटील यांनी भूषवले.
येवती येथील जिल्हा परिषद शाळेत सकाळी ११ वाजता ही विशेष सभा पार पडली. ग्रामपंचायतीत एकूण ९ सदस्य आहेत. यापैकी ८ सदस्यांनी २० जून २०२५ रोजी सरपंच प्रयागबाई पाटोळे यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल केला होता. ठराव दाखल करणाऱ्या सदस्यांमध्ये रामेश्वर कायंदे, नारायण कायंदे, रामेश्वर सानप, पांडुरंग जाधव, अनिता वाघ, लता नागरे, रेणुका डोईफोडे आणि खरात यांचा समावेश होता.
सख्या दोन बहिणी मैत्रिणींकडे जाऊन येतो, असे घरी सांगून गेल्या. त्यानंतर परत आल्या नाही….
विशेष सभेत ग्रामस्थांनी गुप्त मतदानाद्वारे आपले मत नोंदवले. यामध्ये २८० ग्रामस्थांनी ठरावाच्या बाजूने, तर ४१ ग्रामस्थांनी ठरावाच्या विरोधात मतदान केले. यानंतर तहसीलदार भूषण पाटील यांनी अविश्वास ठराव मंजूर झाल्याचे जाहीर केले. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५९ च्या कलम ३५ नुसार, हा ठराव तीन-चतुर्थांश बहुमताने मंजूर झाल्याने सरपंचांचे पद रिक्त झाले.
पुढील आदेश येईपर्यंत ग्रामपंचायतीचा कारभार उपसरपंच रामेश्वर कायंदे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. सभेचे कामकाज पार पाडण्यासाठी नायब तहसीलदार रामप्रसाद डोळे, निवडणूक विभागाचे गोंड, तलाठी खोडके, मंडळाधिकारी सानप, ग्रामसेवक राठोड आणि ग्रामपंचायत कर्मचारी दत्ता बोडखे व पंढरी चव्हाण यांनी सहकार्य केले.
सभेच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस निरीक्षक मेहत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय इंगोले, जमादार गजानन सानप आणि बळीराम सानप यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. अविश्वास ठराव मंजूर होताच गावकऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला.
हा अविश्वास ठराव येवती ग्रामपंचायतीच्या इतिहासातील एक महत्त्वाचा प्रसंग ठरला आहे. ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सदस्यांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला, ज्यामुळे गावच्या कारभाराला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.
1 thought on “येवतीच्या सरपंच प्रयागबाई पाटोळे यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर, सरपंच प्रयागबाई पाटोळे पदमुक्त”