छत्रपती संभाजीनगर (बुलडाणा कव्हरेज न्युज): पैठण तालुक्यातील चितेगाव येथे राहणाऱ्या शिवकन्या या तरुणीने तिच्या पती व सासरच्यांविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पतीने पहिले लग्न लपवून तिच्याशी लग्न केलं आणि नंतर तिला त्रास देऊन तिसऱ्या लग्नासाठी दबाव टाकू लागला.शिवकन्याचं लग्न ७ जुलै २०१८ रोजी प्रदीप उर्फ विष्णू सरोदे (वय ३५) याच्याशी झालं. लग्नानंतर सुरुवातीची दोन वर्षे तिला चांगलं वागवलं गेलं. त्यांना साडेतीन वर्षांचा एक मुलगा आहे. मात्र त्यानंतर तिच्यावर अत्याचार सुरू झाले.
घरातल्या कामांवरून सतत टोमणे, मारहाण, शिवीगाळ केली जाऊ लागली. पतीने दुसऱ्या लग्नाची धमकी दिली आणि तिच्या माहेरून दोन लाख रुपये घेऊन ये, असं सांगून घराबाहेर काढलं.२० फेब्रुवारी २०२५ रोजी पतीने मारहाण केल्यानंतर ती माहेरी फेरणजळगाव येथे राहायला आली. विशेष म्हणजे, लग्नानंतर सहा महिन्यांनी तिला कळलं की, तिच्या पतीचं आधीच एक लग्न झालेलं आहे. ही गोष्ट लपवून तिची आणि तिच्या कुटुंबाची फसवणूक करण्यात आली.
शिवकन्याने करमाड पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पती प्रदीप सरोदे, सासरा बाबासाहेब, सासू सुमन, दीर मनोज, नणंद अनिता, कावेरी शेळके आणि नंदोई दत्ता शेळके (सर्व रा. चितेगाव, ता. पैठण) अशा सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.