खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) – पिंपळगावराजा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कवडगाव येथे कौटुंबिक वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणात दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध तक्रार दाखल केली असून, एकूण आठ जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही घटना ४ ऑक्टोबर रोजी घडली.
पहिल्या तक्रारीनुसार, मेनका पंजाब राठोड यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली की, सुशीला जयसिंग जाधव, जयसिंग हिरालाल जाधव, अविनाश जयसिंग जाधव आणि विशाल जयसिंग जाधव यांनी शिवीगाळ करून काठ्यांनी मारहाण केली. या झटापटीत मेनका आणि त्यांचे पती दोघेही जखमी झाले.
दरम्यान, दुसऱ्या बाजूने जयसिंग हिरालाल जाधव यांनीही तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, राठोड कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्या मुलाला मारहाण केली तसेच पत्नीला धमक्या दिल्या.
या दोन्ही परस्परविरोधी तक्रारींवरून पिंपळगावराजा पोलिसांनी पंजाबराव राठोड, मेनका राठोड, रुख्माबाई राठोड आणि आरती राठोड तसेच दुसऱ्या पक्षातील जाधव कुटुंबातील चार सदस्यांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पिंपळगावराजा पोलिस करत आहेत.











