छत्रपती संभाजीनगर (बुलडाणा कव्हरेज नेटवर्क) :त्वचेच्या उपचारासाठी वाशिम जिल्ह्यातून छत्रपती संभाजीनगर येथे आलेली १७ वर्षीय मुलगी रहस्यमयरीत्या गायब झाली. ही घटना शनिवारी (१३ जुलै) सायंकाळी मध्यवर्ती बसस्थानकावर घडली.मुलगी टॉयलेटला जाते, असे सांगून बसस्थानकावरून निघून गेली. बराच वेळ झाला तरी ती परत आली नाही. शोधाशोध करूनही काही हाती न लागल्यावर आईने तिच्या मोबाइलवर कॉल केला असता, “मी एका मुलासोबत सूरतच्या बसमध्ये बसले आहे,” असे तिने सांगितले.या प्रकारामुळे घाबरलेल्या आईने मुलीच्या अपहरणाची तक्रार रविवारी (१४ जुलै) क्रांती चौक पोलीस ठाण्यात दिली.
तक्रार देणारी महिला वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा येथील असून तिचे वय ३२ वर्षे आहे. ती आणि तिची मुलगी शनिवारी संध्याकाळी त्वचेच्या उपचारासाठी संभाजीनगरमध्ये आल्या होत्या.मुलगी गायब झाल्यामुळे महिलेला सुरुवातीला वाटले की मुलगी मजेमजेसाठी असे बोलत आहे. त्यामुळे ती घरी परत गेली. मात्र घरी गेल्यानंतरही मुलगी तिथे पोहोचलेली नव्हती.
त्यामुळे कोणीतरी तिचे अपहरण केले असावे, असा संशय महिलेने तक्रारीत व्यक्त केला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक रमेश कांदे करीत आहेत.