देऊळगाव मही (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शेतात सोयाबीन सोंगणी सुरू असताना जुन्या वादाच्या कारणावरून एका विवाहित महिलेला मारहाण करून छेडछाड केल्याची घटना वाकी बुद्रुक येथे घडली आहे.
अंढेरा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाकी बुद्रुक येथील ४५ वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ८ ऑक्टोबर रोजी ती आपल्या मुलासह आणि काही मजुरांसह शेतात सोयाबीन सोंगत होती. यावेळी धन्यवाद जायभाये याने जुन्या भांडणाच्या कारणावरून कोणतेही कारण नसताना शिवीगाळ केली आणि चापट-बुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. त्याचबरोबर वाईट हेतूने हात धरून खाली पाडून छेडछाड करण्याचा प्रयत्न केला.
या घटनेनंतर महिलेच्या तक्रारीवरून अंढेरा पोलिसांनी सिंधू धन्यवाद जायभाये, समाधान नारायण जायभाये, धन्यवाद नारायण जायभाये आणि सत्यवान नारायण जायभाये (सर्व रा. वाकी खुर्द) यांच्याविरुद्ध संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली डायरी अंमलदार राजू खार्डे यांनी गुन्हा नोंदवला असून पुढील तपास बीट जमदार देढे करत आहेत.











