सिंदखेडराजा (बुलडाणा कव्हरेज न्युज)नागपूर – मुंबई महामार्गावरील नाल्याच्या पाण्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. हे अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना न केल्यास दि. ५ नोव्हेंबर रोजी नगर पालिका कार्यालयाला कुलूप लावण्यात येईल, असा थेट इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते दिलीप चौधरी यांनी दिला आहे.
राजमाता जिजाऊंच्या ऐतिहासिक सिंदखेडराजा शहराचा विकास रस्त्यावरील साचलेल्या पाण्यामुळे वाहून जात असल्याचा आरोप दिलीप चौधरी यांनी केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून नागपूर – मुंबई महामार्गावरील प्रभाग क्रमांक एकमध्ये संपूर्ण शहरातील पाणी रस्त्यावर येत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या समस्येबाबत नगर पालिकेला कळवले असता, हा रस्ता
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत असल्याचे सांगून नगर पालिका प्रशासन हात वर करत आहे. तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी हे काम नगर पालिकेने करावे, असे सांगत आहेत. नगर पालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या या टोलवाटोलवीमुळे नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षितता धोक्यात आली आहे. नगर पालिकेने नालीचे काम थातूरमातूर सुरू केले आहे. रस्त्यावर पाणी येणार नाही आणि अपघात होणार नाही, याची खबरदारी घेऊन त्या दर्जाची नाली करावी, अशी मागणी चौधरी यांनी केली आहे. अपघात रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात न आल्यास दि. ५ नोव्हेंबर रोजी नगर पालिका कार्यालयाला कुलूप लावण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.















